महिन्याभराहून अधिक काळ ताटकळत ठेवलेला पाऊस आता मजल दरमजल करत संपूर्ण राज्यात बरसत आहे. कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार सरी कोसळत असून राज्याच्या अंतर्गत भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. किमान दोन दिवस पावसाच्या सरी सुरू राहतील, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
शहरात सोमवारी संध्याकाळपर्यंत विश्रांती घेतलेल्या पावसाने ठाणे परिसरात मात्र चांगलाच जोर धरला होता. तलावात पावसाची नोंद फारशी नसली तरी ठाणे, नाशिक परिसरात पावसाची कामगिरी चांगली होत असल्याने पाण्याची पातळी कमी झालेली नाही. येत्या दोन दिवसात कोकण व पश्चिम विदर्भातील बहुतांश ठिकाणी पाऊस अपेक्षित असून राज्याच्या इतर भागातही पावसाच्या मध्यम सरी येतील, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. कोकण परिसरात मुसळधार पावसाची शक्यताही हवामानखात्याने व्यक्त केली.
दरम्यान, साधारणपणे १५ जूनच्या सुमारास गुजरातमध्ये पोहोचणारा मान्सून अखेर तब्बल महिनाभर उशिराने गुजरातमध्ये दाखल झाला. गुजरातचा उत्तर भाग व राजस्थानचा पश्चिम भाग वगळता मान्सून आता संपूर्ण देशात पोहोचला आहे. उर्वरित भागातही मान्सून दाखल होण्यास हवामान अनुकूल आहे. दरम्यान, ओरिसाच्या किनारपट्टीवरही कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने देशात सर्वत्रच पावसाचा प्रभाव वाढला आहे. पश्चिम किनारपट्टी तसेच उत्तर भारतात येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता असतानाच उत्तर राजस्थान आणि पंजाबमध्ये मात्र उष्णतेची लाट पसरण्याचा अंदाज केंद्रीय वेधशाळेने व्यक्त केला.
मुंबईत १० दिवसांत महिन्याभराचा पाऊस
जून महिन्यात पावसाने दडी मारली असली आणि अजूनही सरासरी भरून येण्यास अवकाश असला तरी २ जुलैपासून शहरात बरसण्यास सुरुवात झालेल्या पावसाने अवघ्या १० दिवसात जुलै महिन्याची सरासरी पार केली आहे. जुलै आणि ऑगस्ट हे पावसाचे महिने मानले जातात. जुलै महिन्यात सरासरी ७९९ मिमी पाऊस पडतो. जून महिन्याच्या मध्यावर पावसाने प्रवेश केला तरी त्यानंतर तुरळक सरींपेक्षा पावसाची कामगिरी अधिक झाली नाही. संपूर्ण जूनमध्ये कुलाबा येथे ५७.२ मिमी तर सांताक्रूझ येथे ८८.९ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र २ जुलैपासून पावसाने मुंबईत संततधार धरली. एखाद दोन दिवसांचा अपवाद वगळता शहरात पावसाच्या सरी नियमितपणे लागल्या. १ ते १४ जुलैच्या सकाळी साडेआठ वाजेपर्यंत कुलाबा येथे ७९७ मिमी तर सांताक्रूझ येथे ७३८ मिमी पावसाची नोंद झाली.