लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: मुंबईमध्ये जन्माला येणाऱ्या बालकांचे यशस्वीपणे लसीकरण करण्यामध्ये मुंबई महापालिकेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई महानगरपालिकेने इंद्रधनुष्य मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व बालकांचे लसीकरण करण्याचा संकल्प सोडला आहे. यासाठी विविध धर्माच्या, समाजाच्या नेत्यांची मदत घेण्यात येणार आहे.
मुंबईमधील बालकांच्या लसीकरणात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी, तसेच विशेष मोहीम राबविण्यासंदर्भात मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) सुधाकर शिंदे यांनी शुक्रवारी सर्व विभागांचे प्रमुख आणि आरोग्य अधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीत लसीकरणाबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
आणखी वाचा-मुंबईः विमानतळावर सीआयएसएफच्या जवानाला प्रवाशाकडून मारहाण
काही महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये गोवरच्या साथीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता. यावेळी अनेक विभागांतील बालकांचे लसीकरण पूर्ण झाले नसल्याचे उघडकीस आले होते. परिणामी, मुंबई महानगरपालिकेने विशेष मोहीम राबवूत या विभागांमध्ये लसीकरण पूर्ण केले. मात्र भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने इंद्रधनुष्य मोहिमेंतर्गत शहरातील सर्व विभागातील बालकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. बालकांच्या लसीकरणामध्ये येणाऱ्या समस्या सोडविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. लसीकरणामध्ये येत असलेल्या समस्या जाणून घेण्यासाठी शुक्रवारी सुधाकर शिंदे यांनी सर्व विभागाचे प्रमुख आणि आरोग्य अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेतली. ‘या बैठकीमध्ये लसीकरणातील समस्या जाणून घेतल्या असून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल’, असे शिंदे यांनी सांगितले.
आणखी वाचा-महागाईचा अधिक मास; भाज्यांपाठोपाठ धान्य, जिन्नसांच्या दरांतही वाढ
शहरातील बालकांच्या लसीकरणामध्ये येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी विभागातील विविध धर्माच्या, समाजाच्या नेत्यांची मदत घेण्यात येणार आहे. स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करून लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहेत.
सात विभागांमध्ये विशेष प्रयत्न करणार
गोवरचा उद्रेक झाला त्यावेळी काही भागांमध्ये लसीकरण अजिबात झाले नसल्याचे आढळले. त्यानुसार मुंबईतील कुर्ला, मानखूर्द, गोवंडी, मालाड, धारावी आणि वांद्रे या सात विभागांमध्ये लसीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.