आज सकाळपासून मुंबईसह उपनगरात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. शनिवारपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. त्यानुसार मुंबईसह ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि किनारपट्टी परिसरात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. येत्या तीन ते चार तासांत अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी याबाबतचं ट्वीट केलं आहे. वेरवली येथील डॉपलर रडारने नोंदवलेल्या अद्ययावत माहितीच्या आधारे त्यांनी सांगितलं की, “मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई आणि किनारपट्टी भागात मोसमी पावसाचे ढग साचले आहेत. संबंधित ठिकाणी पुढील तीन ते चार तासांत मध्यम पावसाच्या सरी कोसळणार आहेत.”
पुढील २ ते ३ दिवस मुंबईसह उपनगरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाकडून यापूर्वीच वर्तवण्यात आली आहे. आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाल्याने हवामान विभागाचा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना आयएमडीने येलो अलर्ट (पिवळा इशारा) जारी केला आहे.