लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबई आणि आसपासच्या परिसरात पुढील तीन ते चार तासात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
मुंबई, पुणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने हा इशारा दिला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाने केले आहे. या काळात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील, असेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, मुंबईत आणि आसपासच्या परिसरात सोमवारी दुपारपासून वेगाने वारे वाहत असून ढगाळ वातावरण आहे. विजाही चमकत आहेत. मंगळवारी साजऱ्या होत असलेल्या धुलिवंदनावर अवकाळी पावसाचे सावट आहे.