मुंबईमध्ये आज (सोमवार) सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली असून दिवसभर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा केंद्राकडून वर्तविण्यात आली आहे.
मुंबईला रविवारी सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे रविवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र रविवारी संपूर्ण दिवसभर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, तर सोमवारी पहाटेपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली.
आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत (मागील २४ तासांत) सांताक्रूझमध्ये ९.२ मि.मी., तर कुलाब्यात ११.७ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली. सकाळी ८.३० पासून ते १०.३० पर्यंत मुंबई शहर आणि उपनगरांत ठिकठिकाणी ०.१ मि.मी. ते ५ मि.मी. दरम्यान पावसाची नोंद झाली. केवळ शीव परिसरात ५ मि.मी.पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.
गेल्या २४ तासांमध्ये (सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत) मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या विहार तलावात २६ मि.मी., तुळशीमध्ये ४३ मि. मी, मध्य वैतरणामध्ये ८९ मि.मी, तानसामध्ये ६८ मि.मी., अप्पर वैतरणामध्ये ८८ मि.मी., भातसामध्ये ८९ मि.मी, मोडकसागरमध्ये ७३ मि. मी पावसाची नोंद झाली.
मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात अतिवृष्टी झाली –
सध्या गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत द्रोणीय क्षेत्र आहे. परिणामी, सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत (मागील २४ तासांत) मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात अतिवृष्टी झाली. कोकण-गोवा व मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला, अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली.
मुंबईत १४ जुलैपर्यंत सतर्कतेचा इशारा –
भारतीय हवामान विभागाने मुंबईत १४ जुलैपर्यंत सतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. त्यामुळे सर्व सुरक्षा यंत्रणा, मदतकार्य, बचाव पथके सज्ज झाली आहेत.