पाऊस आणि मध्य रेल्वेचा गोंधळ यांचे समीकरण अगदी पक्के जुळलेले आहे. मग तो पाऊस जून-जुलैमध्ये कोसळणारा असो की, ऐन जानेवारीत पडलेला अवेळी पाऊस असो! जून-जुलैच्या मुसळधार पावसात कोलमडणाऱ्या मध्य रेल्वेच्या सेवेने जानेवारीतल्या हलक्या सरींसमोरही गुडघे टेकले. अवेळी आलेल्या पावसाने ठिकठिकाणच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि मध्य रेल्वेच्या गाडय़ा २५ ते ३० मिनिटे उशिराने धावायला लागल्या. विशेष म्हणजे याच दरम्यान कळवा स्थानकाजवळ अप मार्गावर रुळाला तडा गेल्याने या गोंधळात भर पडली. हा प्रकार ऐन गर्दीच्या वेळी म्हणजे सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला. त्यामुळे गाडय़ा अधिकच उशिराने धावायला लागल्या.
मंगळवारी सकाळी लवकर अवेळी पावसामुळे मध्य रेल्वेच्या कल्याण, कसारा, ठाणे, विक्रोळी आणि घाटकोपर या स्थानकांदरम्यान मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. हा बिघाड दुरूस्त होईपर्यंत गाडय़ा अगदीच धीम्या गतीने धावत होत्या. याचा परिणाम वाहतुकीवर होऊन गाडय़ा २५ ते ३० मिनिटे उशिराने धावायला लागल्या. याच दरम्यान कळवा स्थानकाजवळ अप मार्गावर रुळाला तडा गेला. सकाळी ९.२५ दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे गाडय़ा अधिकच दिरंगाईने धावायला लागल्या. हा बिघाड सुरळीत होण्यासाठी पावणे दहा वाजले. मात्र त्यानंतर गाडय़ा सुरळीत धावत असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी दिली.
गर्दीमुळे तीन तरुण लोकलमधून पडले
या गोंधळादरम्यानच कळवा व मुंब्रा या स्थानकांदरम्यान तीन ठिकाणी तीन तरुण गर्दीच्या रेटय़ामुळे लोकलमधून पडल्याची घटना घडली. तिघांपैकी सिराज शेख याचा मृत्यू झाला, तर मोहम्मद अश्रफ आणि मोइन शेख यांना शीव रुग्णालयात दाखल करण्यात आल़े
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा