गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी दुपारी तडतड बाजा वाजवायला सुरुवात केली. या आधी सलग तीन आठवडे ‘वीकएंड’ला भेट देण्याचा पायंडा मोडत सोमवारच्या पावसाने नोकरदारांना चिंब भिजवले. दुपारी आकाशात ढग दाटून आले आणि पावसाने ताल धरला. मुसळधार पावसामुळे महालक्ष्मी येथील कॅडबरी जंक्शन, एल्फिन्स्टन येथील मुधोळकर मार्ग, प्रभादेवी, मिलन सब-वे, मालाड सब-वे, घाटकोपर, मुलुंड आदी ठिकाणचे सखलभाग जलमय झाले आणि मुंबईकरांची धावपळ उडाली. कोसळणाऱ्या पावसामुळे काही खासगी कार्यालये सोडून देण्यात आली. रेल्वे वाहतूक ठप्प होण्यापूर्वी घर गाठण्यासाठी नोकरदारांची एकच धावपळ उडाली होती. सखलभाग जलमय झाल्यामुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. मुधोळकर मार्ग जलमय झाल्यामुळे येथील वाहतूक अन्य मार्गावरुन वळविण्यात आली होती. दादरच्या हिंदमाता परिसरातही पाणी साचले होते. परंतु पावसाचा जोर ओसरताच पाण्याचा झटपट निचरा झाला.
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी दुपारी १.०२ च्या सुमारास ४.८९ मीटर उंचीची लाट धडकण्याची शक्यता होती. त्यामुळे सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळला असता तर मुंबई जलमय झाली असती. मात्र भरतीची वेळ टळल्यानंतर पाऊस सुरू झाल्यामुळे मुंबईकरांना फारसा फटका बसला नाही. मात्र पावसाचा रुद्रावतार पाहून २६ जुलैच्या आठवणीने मुंबईकरांच्या छातीत धडकी भरली होती.
सोमवारी दिवसभरात कुलाबा ६१.८ मि.मी., तर सांताक्रूझ येथे ६४.७ मिमी. पावसाची नोंद झाली.