मुंबई व आसपासच्या परिसरासाठी शुक्रवारही पावसाचा वार ठरला. सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने रात्रीपर्यंत कधी मुसळधार तर कधी रिमझिम वर्षांव करत मुंबईला चिंब केले. अपुऱ्या नालेसफाईमुळे ठिकठिकाणी लगेचच पाणी तुंबण्यास सुरुवात झाली आणि त्यातून वाट काढताना मुंबईकरांचे हाल झाले. पावसामुळे दादर व माटुंगा रोड दरम्यान सिग्नल यंत्रणा खराब झाल्याने चक्क पश्चिम रेल्वेवर लोकल दहा ते १५ मिनिटे उशिरा धावल्या. तर वडाळा येथे पाणी तुंबल्याने आणि पुढे सिग्नल यंत्रणा बिघडल्याने हार्बर मार्गावरील लोकल तब्बल पाऊण रखडली.
मुसळधार पावसाने मानखुर्द, हिंदमाता, मिलन सबवे, चेंबूरजवळील प्रियदर्शनी आदी भागांत पाणी साचले. पाणी तुंबण्याच्या एकूण १८ तक्रारी आल्या. हिंदमाता आणि जवळच्या एलफिन्स्टन रोड भागात पाणी इतके तुंबले की दुपारी तीन वाजल्यापासून तेथील वाहतूक वळवावी लागली. पावसामुळे ३१ ठिकाणी झाड पडल्याच्या तक्रारी आल्या. दुपारी अडीचच्या सुमारास भोईवाडा येथे इमारतीमधील पानपट्टीचा भाग पडल्याने कृष्णा भोबा (६५) या महिलेच्या डोक्याला मार लागला.
मुंबई शहरात ३२.४ मिमी तर उपनगरात त्याच्या जवळपास तिप्पट ९१.४ मिमी पाऊस पडला. शहरात कमाल तापमान २९.३ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २५.५ अंश सेल्सिअस होते. तर उपनगरात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस व किमान तापमान २४.२ अंश सेल्सिअस
होते.
पूर्व मुक्त मार्ग सुरू
पूर्व मुक्त मार्गाचा वाडीबंदर ते चेंबूपर्यंतचा साडे तेरा किलोमीटर लांबीचा पट्टा शुक्रवारी दुपारी उद्घाटनासाठीचा मंडप हटवल्यानंतर आणि वाहतूक पोलिसांनी तपासणी केल्यानंतर खुला करण्यात आला. त्यामुळे सायंकाळी पूर्व उपनगरे,ठाणे, नवी मुंबईकडे निघालेल्या अनेक वाहनधारकांना पूर्व मुक्त मार्गाचा वापर करून जलद प्रवास करण्याची संधी मिळाली.
अतिवृष्टीचा इशारा
कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राच्या जवळ सरकत असल्याने रविवापर्यंत राज्याच्या बहुतांश भागात मोठय़ा पावसाची शक्यता आहे. त्यातही कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मोठय़ा पावसाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे.