केवळ महाविद्यालयातच नव्हे, तर सहा गावांमध्ये वर्षां जलसंचयनाची मुहूर्तमेढ
दुर्गम भागातील तीव्र पाणीटंचाई, पाण्यासाठी ग्रामस्थांना करावी लागणारी वणवण, टँकरची चातकाप्रमाणे वाट पाहणारे ग्रामस्थ अशा अनेक घटनांची गंभीर दखल घेत शीव येथील साउथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या एसआयईएस महाविद्यालयाने पाणी संवर्धनाचा वसा घेतला. त्यातूनच वर्षां जलसंचयन (रेन वॉटर हार्वेस्टिंग) प्रकल्प राबवून महाविद्यालयातील पाण्याची तहान भागविण्यात आली. इतकेच नव्हे तर पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या दुर्गम भागातील सहा गावांची तहान भागविण्यातही महाविद्यालयाचे व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांना यश आले आहे. पाण्याचे संवर्धन आणि वसुंधरेचे संरक्षण यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करीत एसआयईएस महाविद्यालयाने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
एसआयईएस महाविद्यालयात ज्युनिअर महाविद्यालय ते पीएचडीपर्यंतचे अभ्यासक्रम असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. सकाळी सुमारे ७ ते सायंकाळी ७ या दरम्यान महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा राबता असतो. परिणामी, महाविद्यालयाला मोठय़ा प्रमाणावर पाण्याची आवश्यकता भासत होती. ही वाढती तहान भागविण्यासाठी दोन वर्षांपूर्वी महाविद्यालयात वर्षां जलसंचयन प्रकल्प राबविण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. त्यासाठी पालिकेकडे रीतसर अर्ज आणि सोबत प्रकल्पाचा आराखडा सादर करण्यात आला. परंतु तब्बल एक वर्षांनंतर पालिकेकडून परवानगी मिळाली आणि त्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. या प्रकल्पासाठी महाविद्यालयाने ‘मॉब’ या सामाजिक संस्थेची मदत घेतली. महाविद्यालयाच्या गच्चीवर पडणारे पावसाचे पाणी वाहून जात होते. हेच पाणी साठवून त्याचा वर्षभरासाठी वापर करण्याची कल्पना ‘मॉब’चे विश्वस्त अमित जठार यांनी मांडली. परंतु हे पाणी साठविण्यासाठी भूमिगत टाक्या बांधण्याऐवजी बोअरवेलच्या जवळ खड्डा खणून त्याच्या माध्यमातून गच्चीतून येणारे पाणी जमिनीत मुरविण्याचा विचार पुढे आला. पण समुद्राचे खारे पाणी गोडय़ा पाण्यात मिसळण्याचा धोका लक्षात घेऊन महाविद्यालयात रिंग वेल उभारण्याची कल्पना ‘मॉब’चे सल्लागार डॉ. उमेश मुंडले यांनी मांडली. अखेर रिंग वेल बांधण्यावर शिक्कामोर्तब झाले. गच्चीत पडणारे पावसाचे पाणी रिंग वेलपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र या पाण्यातून कचरा रिंग वेलमध्ये जाऊ नये म्हणून त्यावर गाळणीही बसविण्यात आली. गच्चीत पडणारे पावसाचे पाणी गाळून जमिनीमध्ये मुरण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि आजही महाविद्यालयाला याच रिंग वेलमधून मुबलक पाणी मिळत आहे.
महाविद्यालयाच्या संपूर्ण परिसरात ५० लाख लिटर, तर महाविद्यालयाच्या गच्चीमध्ये ३८ लाख लिटर पावसाचे पाणी पडते. यापैकी ३० लाख लिटर पाणी गाळून जमिनीमध्ये मुरविण्यात यश आले आहे. त्यामुळे कडक उन्हाळा सुरू झाला असला तरी रिंग वेलला मुबलक पाणी असल्याचे निदर्शनास आले आहे. महाविद्यालयाच्या परिसरात फुललेला बगिचा, शौचालये आदींसाठी याच पाण्याचा वापर करण्यात येत आहे. महाविद्यालयाने हा प्रकल्प राबवून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीची ज्योत पेटविली आहे. त्यातूनच आता विद्यार्थी जल संवर्धनासाठी काम करू लागले आहेत, असे महाविद्यालयाच्या प्राचार्या हर्षां मेहता यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
जनजागृतीचे बीज
केवळ महाविद्यालयात वर्षां संचयन प्रकल्प राबवून महाविद्यालयाचे व्यवस्थापन थांबलेले नाही. तर कर्जतजवळील पारध्यांची वस्ती असलेल्या कवठेवाडीची तहान भागविण्यासाठी तेथे हा प्रकल्प राबविला आहे. एका समाज मंदिराची उभारणी करून त्याच्या गच्चीवरील पाणी जमिनीत मुरविले जाते आणि ते पाणी कवठेवाडीला वर्षभर पुरत असल्याचे आढळून आले आहे. कवठेवाडीची लोकसंख्या ६०० आहे. मात्र पूर्वी येथे पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या कवठेवाडीत मुबलक पाणी मिळू लागले आहे. तेथील शाळेलाही याच प्रकल्पातून पाणी देण्यात येत आहे. अशाच पद्धतीने पुढाकार घेत महाविद्यालयाने उस्मानाबाद आणि लातूरमधील पाच गावांमध्ये वर्षां जलसंयचन प्रकल्प राबवून पाणीटंचाईवर मात केली आहे. जल संवर्धनाच्या या महाविद्यालयाच्या कामात एसआयईएस संस्थेचे अध्यक्ष डॉ. शंकर यांचा सिंहाचा वाटा आहे, असे हर्षां मेहता म्हणाल्या. महाविद्यालयाने घेतलेल्या पुढाकारामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये जल संवर्धनाबाबत जनजागृतीचे बीज रोवले गेले असून काही विद्यार्थ्यांनी या कार्यासाठी वाहून घेतले आहे.