रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या संततधारेमुळे मुंबईकरांसाठी सुट्टीचा दिवस ‘पाऊसवार’ ठरला. पावसाच्या मोसमातील पहिल्याच रविवारी ‘धो धो’ बरसलेल्या पावसाने रविवारच्या सुट्टीचा आनंद आणखी द्विगुणित केला आणि उत्साही मुंबईकर घरात न थांबता या पाऊसधारा झेलण्यासाठी बाहेर पडला. उन्हाळ्याने बेजार झालेल्या मुंबईकरांना पावसाची प्रतीक्षा होती. गेल्या काही दिवसांपासून आकाशात दाटणाऱ्या ढगांमुळे पावसाचे पूर्वरंग आख्यान रंगले होते. अखेर शुक्रवारी सायंकाळनंतर पावसाने मुंबईकरांची अपेक्षा पूर्ण केली. शनिवारी पहाटे लागलेल्या मृग नक्षत्रामुळे सुरू झालेला पाऊस चांगला पडणार असे वाटत असतानाच शनिवारी त्याने निराशा केली. पाऊस हुलकावणी देतो की काय, अशी शंका मनात डोकावत असतानाच रविवारी पहाटेपासूनच ‘धारानृत्य’ सुरू झाले आणि दुपापर्यंत ते सुरू होते. मधूनच वाहणारा सोसाटय़ाचा वारा आणि कोसळणारी मुसळधार पावसाची सर वातावरण तजेल बनवत होते.
रविवारची सुट्टी आणि सकाळपासून सुरू असलेल्या संततधारेचा फायदा उत्साही मुंबईकरांनी घेतला. पाऊसधारा अंगावर झेलण्यासाठी मुंबईकरांनी मरिन ड्राइव्ह, दादर, गिरगाव, वरळी, जुहू चौपाटी येथे गर्दी केली होती. यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणाईची संख्या लक्षणीय होती. वाफाळणारा चहा, गरमागरम खमंग भजी आणि बटाटावडय़ाचा आस्वाद घेण्यासाठी अनेकांची पावले पदपथांवरील टपऱ्या-स्टॉलकडे वळताना दिसत होती. सोसायटय़ा आणि चाळींच्या पटांगणामध्ये भर पावसात क्रिकेट, फुटबॉलचे खेळ रंगले होते. घराबाहेर न पडलेल्यांनी घरात बसून आलं/गवती चहा टाकून केलेल्या वाफाळत्या चहाचा आस्वाद घेतला. दुपारच्या जेवणात खास सामिष बेत करून काहींनी पावसाची मजा लुटली, तर काही जणांनी जेवणानंतर दुपारी ढगाळलेल्या या कुंद वातावरणात चक्क ताणून दिली. दुपारनंतरही पावसाची रिमझिम सुरू असल्याने अनेक घरी सायंकाळी गरमागरम कांदा भजीचा बेतही पार पडला. सायंकाळनंतर पावसाची रिपरिप कमी झाल्यानंतर अनेक जण फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्याचे दिसत होते.

तापमानात घट
रविवारी पहाटेपासून मुंबई व लगतच्या परिसरांत पावसाने जोरदार हजेरी लावत दिवसभर मुक्काम ठोकल्याने मुंबईकरांसाठी रविवार ‘पाऊसवार’ ठरला. उन्हाच्या काहिलीमुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांचा सुट्टीचा आनंद या संततधार पावसामुळे द्विगुणित झाला. मुंबई शहरात ३९.३ मिमी तर उपनगरात ९८ मिमी पाऊस पडला, तर तापमान कमाल ३१ अंश सेल्सिअस व किमान २५.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले; पण दिवसभराच्या पावसामुळे शहरातील कमाल तापमान ३.२ अंशांनी खाली आले, तर उपनगरात तब्बल पाच अंश सेल्सिअसने घटले. तापमानात मोठी घट झाल्यामुळे  हवेत सुखद गारवा पसरला होता.