लोकलमधी महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या महिला लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाईनवर मोठ्या संख्येने तक्रारी करू लागल्या असून अनेक वेळा मदत मिळावी यासाठीही महिला या हेल्पलाईनवर संपर्क साधत आहेत. यामध्ये बॅग हरविल्याच्या तक्रारीची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात घुसखोरी करून प्रवास करणाऱ्या पुरुष प्रवाशांविरोधातही तक्रारी करण्यात येत आहेत. जानेवारी ते जून २०२२ या काळात लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाईनवर महिला प्रवाशांनी एकूण दोन हजार १७५ तक्रारी केल्या आहेत. यामध्ये १,४४४ तक्रारी या हरवलेल्या बॅगा आणि आरक्षित डब्यातील पुरुष प्रवाशांच्या घुसखोरीविषयी आहेत.
रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठी लोहमार्ग पोलिसांची १५१२ हेल्पलाईन कार्यरत आहे. प्रवासात एखादी वस्तू हरविणे, विसरणे याशिवाय लोकलमधील महिला आणि अपंगांच्या राखीव डब्यातील अन्य प्रवाशांची घुसखोरी, विनयभंग, छेडछाड, फेरीवाला, भिकारी, मद्यपी प्रवाशांचा उपद्रव इत्यादी तक्रारी हेल्पलाईनवर करण्यात येतात. हेल्पलाईनवर दिवसाला ५०० ते ६०० दूरध्वनी येत असतात. यामध्ये तक्रारींंबरोबरच प्रवासी माहिती मिळविण्यासाठी चौकशीही करीत असतात. लोकलमध्ये विसरलेल्या आणि गहाळ झालेल्या वस्तूंच्या तक्रारींची संख्या अधिक आहे. या तक्रारींची दखल घेऊन लोहमार्ग पोलिसांची यंत्रणा कामाला लागते आणि संबंधित प्रवाशाची वस्तू मिळवून त्याला ती परत देण्याचा प्रयत्न करण्यात येतो.
तक्रार करणाऱ्यांमध्ये महिला प्रवाशांची संख्या अधिक आहे. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते जून २०२२ दरम्यान हेल्पलाईनवर महिलांनी २ हजार १७५ तक्रारी केल्या आहेत. यापैकी १ हजार १८५ तक्रारी बॅग हरविल्याच्या आहेत. तर महिलांमधील भांडणे, वादावादीच्या ८९ तक्रारींचा यात समावेश आहे. महिलांमध्ये आसनांवरून किंवा धक्का लागण्यावरूनही वाद होतात. महिला प्रवासी प्रवासादरम्यान सतर्कता दाखवत असून सापडलेल्या बेवारस सामानाविषयी ८६ तक्रारी हेल्पलाईनवर करण्यात आल्या आहेत. महिलांसाठी आरक्षित असलेल्या डब्यातून प्रवास करण्याची परवानगी पुरुष प्रवाशांना नाही. तरीही पुरुष प्रवासी या डब्यामध्ये घुसखोरी करतात. याविरोधातही हेल्पलाईनवर तक्रारी करण्यात आल्या आहेत. घुसखोर प्रवाशांविरोधात २५९ तक्रारी करण्यात आल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले. गुन्हे विषयक तसेच आढळलेल्या संशयास्पद हालचालींबाबत २३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. इतर ५३३ तक्रारी आहेत. या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न
रेल्वे प्रवासादरम्यान महिला प्रवाशांच्या सुरक्षेचाही प्रश्न वारंवार ऐरणीवर येत आहे. गेल्या सहा महिन्यांत विविध लोहमार्ग पोलीस ठाण्यात महिलांविषयक ४३ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक ३९ तक्रारी विनयभंगाच्या आहेत. तर छेडछाडीच्या चार तक्रारींचा त्यात समावेश आहे. छेडछाडीच्या गुन्ह्यात पाच जणांना अटक करण्यात आली असून विनयभंगाच्या गुन्ह्यात ३९ जणांना अटक केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.