राज कुंद्राला अटक झाल्याच्या वृ्त्तापेक्षाही अटकेच्या कारणाने सगळीकडे खळबळ उडाली. एका भाड्याने घेतलेल्या बंगल्यात तयार केल्या जाणाऱ्या पॉर्न फिल्म्स निर्मितीचे धागेदोरे थेट एका उद्योगपतीपर्यंत पोहोचले. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी ११ जणांना अटक केली. यातील काही जण जामीनावर सुटले. प्रकरणाचा तपास पुढे सरकत असताना या Porn apps चा मुख्य सुत्रधार राज कु्ंद्रा असल्याचे पुरावेच पोलिसांच्या हाताला लागले आणि पोलिसांनी कु्ंद्राला बेड्या ठोकल्या.
मूळात या पॉर्न फिल्म्स निर्मिती आणि प्रदर्शन उद्योगाचा पर्दाफाश झाला २०२१ च्या फेब्रुवारीत! चंदेरी दुनियेत स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवण्याची स्वप्न बघत मुंबईत येणाऱ्या तरुणींना हे पॉर्न फिल्म्स निर्मिती करणारे जाळ्यात अडकवायचे. बॉलिवूड चित्रपटात संधी देतो असे सांगून त्यांना अश्लील चित्रपटात करण्यास भाग पाडायचे आणि नंतर हे चित्रपट Porn apps च्या माध्यमातून आणि वेबसाईटवरून देशात आणि परदेशात वितरित करायचे.
Porn apps पैकी एक हिटहॉट नावाचं अॅप होतं. हे पोलिसांच्या तपासात समोर आलं. मालाड पश्चिममधील मढ गावात पॉर्न चित्रपटांची निर्मिती करणाऱ्यांनी एक बंगला भाड्याने घेतला. तिथे या पॉर्न चित्रपटाचं चित्रीकरण ते करायचे. या व्हिडीओच्या माध्यमातून कंपनी लाखो रुपये कमवायची. इतकंच नाही, तर या प्रकरणातील आरोपी या चित्रपटांचे ट्रेलर सोशल मीडिया साईटवरही पोस्ट करायचे. हे सगळं सुरू असताना मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेल विभागाला खबऱ्याने या उद्योगांची माहिती दिली.
Porn apps Case : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई
मालाड पश्चिमेला असलेल्या मढ गावात एका भाड्याने घेतलेल्या बंगल्यात पॉर्न चित्रपटांचं शुटिंग केलं जात असल्याचं कळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाई केली. एपीआय लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने धाड टाकली. पोलिसांचं पथक दाखल झालं तेव्हाही पॉर्न चित्रपटाचं शुटिंग सुरूच होतं. यात पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश होता. हॉटहिट अॅप्सवर हे चित्रपट प्रदर्शित केले जाता हे सुद्धा पोलिसांच्या चौकशीत उघड झालं.
या प्रकरणात ‘गंदी बात’ फेम गहना वशिष्ठ या अभिनेत्रीला पोलिसांनी अटक केली. ती व्हिडीओच्या माध्यमातून पैसे कमवत असल्याचंही समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी यास्मीन रसूल बेग खान उर्फ रोवा यास्मीन, दीपंकर खासनवीस, प्रतिभा नलावडे, मोहम्मद आतिफ नासीर अहमद उर्फ सैफी, मोनू गोपालदास जोशी, भानुसूर्यम ठाकूर, वंदना रवींद्र तिवारी उर्फ गहना वशिष्ठ, उमेश कामत, दीपंकर खासनवीस यांना अटक केली होती.
संबंधित वृत्त- पॉर्न व्हिडीओ बनवणारी ‘गंदी बात’मधील गहना वशिष्ठ आहे तरी कोण?
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती एकएक माहिती मिळत गेली. रोवा आणि तिचा पती दीपंकरने हॉहीट ही वेबसाईट आणि अप्स तयार केलं होतं. यात दीपंकर हा सहसंचालक होता. याच अॅप्स आणि साईटवरून ते पॉर्न चित्रपट प्रदर्शित करायचे. तर अभिनेत्री गहना वशिष्ठ परदेशातील कंपनीला पॉर्न फिल्म्स पाठवायची. पॉर्न फिल्म्सच्या माध्यमातून तू पैसे कमवायची. याची चौकशी सुरू असताना गहनाचं भारतातील काम पाहणारा उमेश कामत पोलिसांच्या हाताला लागला.
Property Cell of Mumbai Police’s Crime Branch has so far arrested a total of 11 people in a case relating to the production of Pornography including Raj Kundra: Mumbai Police
— ANI (@ANI) July 19, 2021
उमेश कामत राज कुंद्रा अर्थ साहाय्य करत असलेल्या एका स्टार्ट अप मध्ये व्यवस्थापकीय संचालक आहे. उमेश कामतच्या अटकेनंतर पोलिसांचा तपासराज कुंद्रा याच्या दिशेला सरकला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात राज कुंद्रा यांच्या सहभागाबद्दल तपास सुरू केला. यात पोलिसांच्या हाती बरेच पुरावे लागले, ज्यातून राज कुंद्रा हेच या संपूर्ण पॉर्न फिल्म्स निर्मिती आणि Porn apps चे सूत्रधार असल्याचं पोलिसांना दिसून आलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सोमवारी (१९ जुलै) चौकशीसाठी बोलावलं. चौकशीनंतर कुंद्रा यांना बेड्याच ठोकण्यात आल्या.