‘कामात व्यस्त असल्याने राज काय करतो माहित नाही’ असा जबाब अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पोलिसांना दिला आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती व उद्योगपती राज कुंद्रा याच्यासह चौघा जणांविरोधात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी १४६७ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. शिल्पाचा हा जबाब त्या आरोपपत्रात आहे.

शिल्पाच्या साक्षीनुसार, राज कुंद्रा यांने २०१५ मध्ये “विआन इंडस्ट्रीज ली.’ नावाची कंपनी सुरू केली होती. त्या कंपनीमध्ये शिल्पा शेट्टीचे २४.५० टक्के समभाग होते. या कंपनीत शिल्पा एप्रिल २०१५ ते जुलै २०२० या कालावधीत संचालक पदावर होती. त्यानंतर तिने वैयक्तिक कारणास्तव संचालकपदाचा राजीनामा दिला असल्याचे साक्षीत सांगितले. हॉटशॉट अ‍ॅप व बॉली फेम या संदर्भात आपल्याला काही माहिती नसल्याचे तिने सांगितले. कामात व्यस्त असल्याने पती राज कुंद्रा काय करतो त्यांना माहिती नसल्याचे शिल्पाने जबाबात सांगितले आहे.

पॉर्न चित्रफीत निर्माण करून त्याच्या प्रसारणासाठी कुंद्राने 2019 मध्ये आर्म्स प्राईम मीडिया नावाने कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून पॉर्न चित्रफीती प्रसारणासाठी तयार करण्यात आलेले हॉटशॉट्स नावाचे अ‍ॅप्लिकेशन लंडनस्थित केनरीन कंपनीला विकले. पण या अ‍ॅप्लिकेशनबाबतची बरीच कामे कुंद्रामार्फतच चालू होती. या अ‍ॅप्लिकेशन निर्मितीसाठी राज कुंद्राने पैशांची गुंतवणूक केली होती. कुंद्रा हा पॉर्नोग्राफी प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे गुन्हे शाखेला मिळाले आहेत. कुंद्रासह मालमत्ता कक्षाने कारवाई करून या अश्लील अ‍ॅप्लिकेशनच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख रायन जॉन मायकल थॉर्प यालाही अटक केली होती. त्याचाविरोधातही गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी ३७ वे न्यायालय यांच्याकडे हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणाचा बहुतांश तपास पूर्ण झाला असून उर्वरीत परदेशातील बँकांकडून पैशांच्या देवाण-घेवाणीबाबतची माहिती गुन्हे शाखेने मागितली आहे. ती अद्याप प्रलंबित आहे.

Story img Loader