मनसे प्रमुख राज ठाकरे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस व राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज मुलाखत घेतली. या मुलाखतीत एका प्रश्नाचं उत्तर देताना राज ठाकरे आदित्य ठाकरेंना स्वयंभू म्हणाले. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी राज ठाकरेंना कधी आदित्य ठाकरेंना कोणत्या टिप्स दिल्यात का? असा प्रश्न विचारला.
राज ठाकरेंना त्यांचे काका, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना प्रभावी वक्तृत्वासाठी नक्कीच काही टिप्स मिळाल्या असतील, त्याप्रमाणे त्यांनी कधी काका म्हणून आदित्य ठाकरेंना कोणत्या टिप्स दिल्यात का? त्यावर राज यांनी उत्तर दिलं. “मी ज्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडलो, त्यावेळी तो (आदित्य ठाकरे) खूप लहान होता. त्यामुळे अशा टिप्स देण्याचा काही विषय आला नाही. मलाही बसवून हे कर ते कर, असं बाळासाहेबांनी कधी सांगितलं नव्हतं. संस्कार तुमच्यावर होत असतात, तुम्ही ते घ्यायचे असतात. ती प्रक्रिया तुमच्यासमोर घडत असते. त्यामुळे तुम्ही जे बघणार ते शिकत जाणार. ती काही शाळा नसते, जिथे बसवून गोष्टी शिकवल्या जातात,” असं राज ठाकरे ‘लोकमत’च्या मुलाखतीत म्हणाले.
हेही वाचा – तुमची प्रतिमा डॉनसारखी का आहे? अमृता फडणवीसांच्या थेट प्रश्नाला राज ठाकरेंचंही तितकंच स्पष्ट उत्तर, म्हणाले…
बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला हात पकडून व्यंगचित्र शिकवले नाहीत, असंही राज ठाकरेंनी सांगितलं. “एखाद्याला इच्छा असेल, ओढ असेल तर तो आपल्या भोवती घडणाऱ्या गोष्टींचं निरीक्षण करत जातो. ओढ नसेल तर तो बघत पण नाही. मला शाळेत अनेक शिक्षकांनी शिकवण्याचा प्रयत्न केला. पण मला ओढच नव्हती. त्यामुळे ते काय करतील. माझ्या वडिलांचं हिंदी, उर्दू उत्तम होतं, त्यांना लिहिता, वाचता, बोलता यायचं. माझं उर्दू चांगलं नाही, पण त्यांच्यामुळे माझं हिंदी चांगलं झालं. ते काही त्यांनी त्यांनी मला बसून शिकवलं नाही. पण, ते लिहित, वाचत, बोलत असताना मी माझ्या निरीक्षणातून शिकत गेलो. व्यंगचित्र मी बघून शिकलो. बाळासाहेबांनी माझा हात धरून ब्रश मारायला शिकवलं नाही. त्यामुळे तुम्ही जेवढं बघाल, तेवढे तुमच्यावर संस्कार होत जातात,” असं राज ठाकरे म्हणाले.