मुंबई : कोणाशीही युती न करता मनसे विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी गोरेगाव येथील पदाधिकारी मेळाव्यात केली. कोणी मागितले नसताना फुकट पैसे वाटपाच्या योजना राज्य सरकारने निवडणुकीसाठी जाहीर केल्या असून जानेवारी-फेब्रुवारीत सरकारकडे कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नसतील. पैसे देण्याऐवजी महिलांना आणि इतरांना रोजगार व काम द्यावे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. ठाकरे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’आणि अन्य योजनांवर टीकास्त्र सोडले.
विधानसभा निवडणुकीनंतर मनसे सत्तेमध्ये असेल, हे लक्षात ठेवावे. जनतेच्या अपेक्षेनुसार उत्तम असा महाराष्ट्र घडवून दाखविण्याचा निर्धार ठाकरे यांनी व्यक्त केला. बदलापूर येथे लहान मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण मनसेच्या महिला कार्यकर्त्याने बाहेर काढले नसते, तर कधीच कळले नसते. मनसे कार्यकर्त्यांनी दक्ष राहून जनतेची फसवणूक किंवा अन्याय होत असल्यास लक्ष ठेवावे, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.