महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्या एका दौऱ्यात टोलनाक्याची तोडफोड झाल्यावर भाजपा नेत्यांनी सडकून टीका केली. तसेच मनसेने रस्ते बांधायला आणि टोलनाके उभे करायलाही शिकावं असं म्हणत हल्लाबोल केला. याला आता मनसे प्रमुख राज ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्यावर टीका करणाऱ्या भाजपाने आधी इतरांचे आमदार न फोडता स्वतःचा पक्ष उभा करायला शिकावं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. ते बुधवारी (१६ ऑगस्ट) पनवेलमध्ये आयोजित मेळाव्यात बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, “त्या दिवशी आमचा अमित कुठेतरी जात होता. त्यावेळी टोलनाका फुटला. त्यावर लगेच भाजपाने टीका सुरू केली. भाजपाने म्हटलं की, रस्ते बांधायलाही शिका आणि टोल उभे करायलाही शिका. मला असं वाटतं की, भाजपाने दुसऱ्यांचे आमदार न फोडता स्वतःचा पक्ष उभा करायलाही शिकावं.”
“लोकांच्या डोक्यावर बंदुका ठेवायच्या आणि त्यांना पक्षात आणायचं”
“लोकांच्या डोक्यावर बंदुका ठेवायच्या आणि त्यांना पक्षात आणायचं. त्यानंतर ती लोक गाडीत झोपून जाणार. यानंतर म्हणणार, ‘मी तुला गाडीत दिसलो का, मी झोपलो होतो का, मी होतो का.’ म्हणजे महाराष्ट्रात निर्लज्जपणाचा कळस सुरू आहे,” असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.
“अरे कशाला खोटं बोलता”
“तुम्ही या सरकारमध्ये का आलात असं विचारलं की, म्हणतात मला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. अरे कशाला खोटं बोलता. ६ दिवसांपूर्वी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. त्यानंतर हे सगळे टुणकन भाजपाबरोबर आले,” असाही आरोप राज ठाकरेंनी केला.