मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केलीय. शिवसेनेतील बंडखोरीनंतर यामागे देवेंद्र फडणवीसांसह भाजपावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवरही आरोप झाले. यावरून शिवसेनेतील फुटीला भाजपा जबाबदार आहे की शरद पवार जबाबदार या प्रश्नावरही राज ठाकरे बोलले. ते झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेनेत बंडखोरी झालीच नसती. ते शक्यच नव्हतं. शिवसेना एक पक्ष म्हणून पाहू नका. बाळासाहेब होते तोपर्यंत शिवसेनेत बाळासाहेबांच्या विचाराने माणसं बांधली गेली होती. बाळासाहेब होते तोपर्यंत तो विचार होता आणि त्या विचाराने बांधलेली ती माणसं होती. त्यामुळे बाळासाहेब असते तर बंडखोरी झालीच नसती.”

“मी देवेंद्र फडणवीसांना उगाच फुकटचं श्रेय घेऊ नका असं सांगितलं”

“माझ्याकडे देवेंद्र फडणवीस आले होते. मी त्यांना म्हटलं उगाच फुकटचं श्रेय घेऊ नका. ते जोरजोरात हसायला लागले. जी गोष्ट घडली ती गोष्ट ना फडणवीसांनी घडवली, ना अमित शाहांनी घडवली, ना भाजपाने ना अजून कोणी घडवली,” असं राज ठाकरे म्हणाले.

याचं श्रेय तुम्हाला उद्धव ठाकरेंनाच द्यावं लागेल. कारण त्यांच्यामुळे हे एकदा घडलेलं नाही. आज आमदार बाहेर पडले तेव्हा आणि मी बाहेर पडलो तेव्हाही कारणं हीच होती. मध्यंतरी आणखी काही लोक सोडून गेले तेव्हीही कारणं हीच होती,” असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.

“संजय राऊतांच्या वक्तव्यांनी शिवसेनेचे आमदार फुटले नाहीत”

संजय राऊतांवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “संजय राऊतांनी अनेक प्रतिक्रिया दिली. संजय राऊतांचा यात काय संबंध? ते रोज सकाळी टेलिव्हिजनवर येतात, अहंकारात रोज काही ना काही बोलतात. त्याने लोक वैतागले आहेत. ते तेवढ्यापुरतं होतं.”

हेही वाचा : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अमित ठाकरेंना मंत्रिपद? राज ठाकरेंनी केलं स्पष्ट

“संजय राऊतांच्या वक्तव्यांनी आमदार फुटत नसतात,” असं म्हणत राज ठाकरेंनी संजय राऊतांवरही टोला लगावला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray answer who is responsible for rebel in shivsena sharad pawar bjp devendra fadnavis pbs