येळ्ळूरमध्ये कर्नाटक पोलिसांनी मराठी लोकांना केलेल्या अमानुष मारहाणीनंतरही केंद्र सरकार गप्प का, असा संतप्त सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. हेच जर महाराष्ट्रात परप्रांतीयांबाबत झाले असते तर चित्र काय दिसले असते, असाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राने सेना-भाजपचे ४२ खासदार निवडून दिले असून ते आता काय करणार ते पाहायचे आहे, असेही राज म्हणाले. मराठी बांधवांवर कर्नाटक पोलिसांनी केलेल्या अत्याचारांनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही गप्प आहेत ही दुर्दैवी गोष्ट आहे, असे सांगून त्यांनी केंद्राकडे तक्रार करायला हवी होती, असे राज म्हणाले. येळ्ळूरमधील प्रकार हा निषेधार्हच आहे. मात्र आता कोणीच का बोलत नाही, महाराष्ट्रातील खासदार आता कोठे आहेत की ते केवळ नावापुरता विषय उपस्थित करून गप्प बसणार आहेत ते आता मला पाहायचे आहे, असेही राज म्हणाले. सीमाभागांतील बांधवांवर वेळोवेळी अत्याचार होत आले आहेत. आता केंद्र सरकार गप्प का बसले आहे, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात जर परप्रांतीयांना मारहाण झाली असती तर देशात गदारोळ झाला असता, परंतु या प्रकरणी भाजपवाले केवळ पत्रक काढून गप्प बसतात, त्यांना असल्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नसते असा टोलाही राज यांनी लगावला.

Story img Loader