लोकांमधील असुरक्षिततेचा फायदा घेऊन स्वतःची दुकाने थाटणाऱयांनीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या घडवून आणल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी दुपारी केला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची मंगळवारी सकाळी पुण्यातील महर्षी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी सरकारवर तोफ डागली. 
ते म्हणाले, पुण्यासारख्या ठिकाणी दाभोलकरांची हत्या व्हावी, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांच्या मारेकऱयांना लवकरात लवकर पकडले नाही, तर बोट सरकारकडे जाते. दाभोलकरांबद्दल सत्ताधारी राजकारण्यांना एवढे प्रेम होते, तर जादूटोणाविरोधी विधेयक आतापर्यंत मंजूर का करण्यात आले नाही. लहान मुलांचा बळी देण्याची प्रथा कोणत्या धर्मात बसते. त्यांचा देवाला किंवा धर्माला अजिबात विरोध नव्हता. बुवाबाजीसारख्या भंपक गोष्टींना त्यांनी कायम विरोध केला.
सुमारे महिनाभरापूर्वीच त्यांची आणि माझी भेट झाली होती, असे सांगून राज ठाकरे म्हणाले, माझ्या आजोबांचे प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार पुढे चालविणाऱयांपैकी ते एक होते. मला त्यांच्या विचारांमध्ये कुठेही चुका दिसल्या नाहीत. त्यांच्या हत्येमुळे महाराष्ट्रात आता विचार मांडायचा की नाही, असाच प्रश्न पडला आहे.