महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एक व्हिडीओ शेअर करत मणिपूरमधील हिंसाचारावर भाष्य केलं आहे. या व्हिडीओत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये एका ईशान्य भारतातील मुलीला एक प्रश्न विचारतात आणि त्यावर ती जे उत्तर देते त्याने सर्वांचेच डोळे उघडतात. तसेच यानंतर मणिपूरमधील हिंसाचाराचे काही फोटोही दाखवण्यात आले आहेत. तसेच केंद्र सरकार आणि देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटणारे यावर गप्प का? असा सवालही करण्यात आला.
व्हिडीओत नेमकं काय?
व्हिडीओच्या सुरुवातीला ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये एका ईशान्य भारतातील एका मुलीला कोहिमा शहर कोणत्या देशात आहे असा प्रश्न विचारताना दाखवलं आहे. तसेच या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी अमिताभ बच्चन चीन, नेपाळ आणि भारत असे तीन पर्याय सांगतात. दुसरीकडे ही मुलगी या शोमध्ये पोहचल्याचं पाहून चेष्टा मस्करी करणारे काही नागरिक दिसत आहेत. हा शो देशभरातील लोक पाहत आहेत आणि त्यात रोजगारासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागात गेलेले ईशान्य भारतातील नागरिकही दिसत आहेत.
“सर्वांना माहिती आहे, पण तसं मानायला किती जण तयार आहेत”
विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ही मुलगी ‘ऑडियन्स पोल’ची निवड करते. त्यावर पुन्हा काही लोक हसताना दिसतात. अमिताभ बच्चन पोलमध्ये १०० टक्के लोकांनी कोहिमा भारतात असल्याचं सांगतात. तसेच हे सर्वांना माहिती आहे असं नमूद करतात. त्यावर ती मुलगी सर्वांना माहिती आहे, पण तसं मानायला किती जण तयार आहेत असा प्रश्न करते. त्यावर आधी चेष्टा करणाऱ्यांची मान शरमेने खाली झुकते. यावेळी देशभरातील इतर ईशान्य भारतीय नागरिकांच्या चेहऱ्यावर आपलंच दुःख मांडल्याचं समाधान दिसतं.
“देशभक्तीची प्रमाणपत्र वाटणारे तथाकथित देशभक्त यांनी मौन का?”
या व्हिडीओत पुढे मणिपूरमधील हिंसाचाराचे काही फोटो दाखवत मत मांडलं आहे. “गेले दोन महिने ईशान्य भारतातील मणिपूर हे राज्य शब्दशः संतापाने धुमसतंय. केंद्र सरकार असो वा देशभक्तीची प्रमाणपत्र वाटणारे तथाकथित देशभक्त यांनी मौन का बाळगलं आहे?”, असा सवाल या व्हिडीओत विचारण्यात आला आहे.
हेही वाचा : “…तर मोदी सरकार जबाबदार असेल”, मणिपूर हिंसाचारावर राज ठाकरेंची थेट भूमिका
“…अन्यथा ईशान्य भारतात देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल”
दुखवालेल्या मनांना आधार द्यायला हवा अन्यथा ईशान्य भारतात देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे. तसेच मणिपूरमधील हिंसाचार रोखा, तिथे शांतता प्रस्थापित करा, असं आवाहन केलं आहे.