महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि कलाप्रेमी राज ठाकरे आज चित्र प्रदर्शनासाठी जहांगिर आर्ट गॅलरी येथे गेले होते. तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर टीका केली. कोणत्याच सरकारांना आपल्या देशातील कलाकारांची किंमत नाही, असं ते परखडपणे म्हणाले.
“आपल्या देशातील अनेक लोकांना कलाकारांची आणि कलेची किंमत नाही, सरकारांना किंमत नाही. खरंतर हे रवी परांजपे फ्रान्समध्ये असते, इंग्लडमध्ये असते तर त्यांच्या पेटिंग्सची काय व्हॅल्यू असती? काय प्रकारे प्रेझेंट केलं असतं? याचा विचारही न केलेला बरा”, असं राज ठाकरे म्हणाले.
“प्रदर्शन कुठे लागलं पाहिजे, कशाप्रकारे लागलं पाहिजे यासंदर्भात मी बोललो आहे. ज्या कोणाला थोडातरी चित्रकलेचा गंध असेल त्याने स्वतः येऊन हे चित्रप्रदर्शन पाहावं. जे लहान असतील त्यांनी त्यांच्या आई-वडिलांना घेऊन यावं”, असं आवाहनही त्यांनी केलं.
चित्रप्रदर्शनासाठी देशात प्रदर्शन केंद्रांची कमतरता आहे, हा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, “प्रदर्शनासाठी जमिनीची कमतरता नाही. इच्छाशक्तीची कमतरता आहे. प्रदर्शनासाठी जागा उभारल्या गेल्या तर सरकारसाठी हे सहज सोपं आहे . यातून अनेकांना प्रोत्साहन मिळेल. आंतरराष्ट्रीय दर्जाचं काम होऊ शकेल. इतके उत्तम चित्रकार, शिल्पकार आपल्याकडे आहेत. फक्त त्यांना प्रोत्साहानाची गरज आहे, असं राज ठाकरे म्हणाले.