राज्यात परतीच्या पावसामुळे शेकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ आणि मराठावाड्यात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन सारखी पिकं काढून ठेवली होती. मात्र, पावसामुळे ही पिकं खराब झाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून या शेकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करणारे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे सरकारला दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “वरळीच्या आमदारांना पेग, पेंग्विन आणि…”, आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंवर टीकास्र

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

“ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा”, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

“या वर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसाने तर कहर केला. या परतीच्या पावसाने खरीप पिकांचे अपरिमित नुकसान केलं आहे. एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतीतही शेतकरी बांधव चिंतातुर आहे. ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पीक वाया गेले आहे. यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत, हे चांगलच आहे, पण तेवढं पुरेसं नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान मोठं आहे. त्यामुळे राज्य सरकारने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा”, असे राज ठाकरे यांनी पत्रात लिहिले आहे.

हेही वाचा – मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांची आत्महत्या, २३ व्या मजल्यावरुन मारली उडी

“सरकारने पंचनाप्याचे आदेश दिले आहेत, पण पूर्वानुभवानुसार प्रशासकीय पातळीवर ते पंचनामे नीट होत नाहीत. गरजू शेतकरी नेहमीच उपेक्षित राहतो. त्यामुळे सरकारने हे पंचनामे नीट होतील, हे पहावे आणि परिस्थितीचा युद्धपातळीवर आढावा घेऊन राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा. तसंच कोरडवाहू आणि बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना जी प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई दिली जाते, ती पुरेशी नाही तिचादेखील पुनर्विचार करावा”, अशी मागणीही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

हेही वाचा – ‘मराठी कलाकारांची चेष्टा’, भाजपाच्या कार्यक्रमात राहुल देशपांडेंचा अपमान? टायगर श्रॉफचा सत्कार करण्यासाठी गाणं थांबवल्याचा आरोप

“दिवाळी हा आनंदाचा सण आहे. खरंतर लॉकडाऊनच्या संकटानंतर शेतकरीही दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्याच्या मनस्थितीत असणार, अशा वेळी त्यांना दिलासा देऊन त्यांचीही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावं”, असेही ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray demand to announced wet drought for farmers in maharashtra wrote letter to shinde government spb