देशाचं लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी (१३ मे) लागला. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपाचा दारूण पराभव केला. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी हा पराभव भाजपाच्या स्वभावाचा आणि वागणुकीचा असल्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं. ते रविवारी (१४ मे) अंबरनाथमध्ये आले असताना पत्रकारांशी बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, “मी मागे माझ्या भाषणात म्हटलं होतं की, विरोधी पक्ष हा जिंकत नसतो, तर सत्ताधारी हरत असतात. मला वाटतं हा पराभव स्वभावाचा पराभव आहे, वागणुकीचा पराभव आहे. आपलं कोण वाकडं करू शकतो अशा विचाराचा जो असतो त्याचा हा पराभव आहे, असं मला वाटतं.”
“जनतेला, लोकांना कधीही गृहित धरू नये”
“जनतेला, लोकांना कधीही गृहित धरू नये, हा बोध या निकालातून सर्वांनी घ्यावा,” असंही राज ठाकरेंनी नमूद केलं. कर्नाटक निकालाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार का? असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले, “कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून महाराष्ट्रातील निकालाबाबत लगेच सांगता येणार नाही.”
कर्नाटक विधानसभेचा निकाल काय?
कर्नाटक विधानसभेच्या २२४ पैकी १३५ जागांवर काँग्रेस पक्ष विजयी ठरला असून काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर सत्ताधारी भाजपाला केवळ ६५ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. जनता दल (सेक्युलर) पक्षालाही साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१८ विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत जेडीएसची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. जेडीएसला केवळ १९ जागा जिंकता आल्या.
हेही वाचा : कर्नाटकात भाजपाचा दारूण पराभव, पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “काँग्रेसचं…”
या निवडणुकीत काँग्रेसला ४२.९ टक्के मतं मिळाली आहेत. तर भाजपाला ३६ टक्के मतं मिळाली आहेत. जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत घट झाली असून या पक्षाला १३.३ टक्के मतं मिळाली आहेत.