मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कोकणातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी कोकणातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून जाहीर नाराजी व्यक्त केली. समृद्धी महामार्ग अतिशय कमी कालावधीत होतो, मग कोकणातील रस्ता का नाही? असा थेट प्रश्न राज ठाकरेंनी गडकरींना विचारला. ते मंगळवारी (२० डिसेंबर) माध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरे म्हणाले, “मी त्या दिवशी दवेंद्र फडणवीसांना भेटलो होतो. त्याच्याशी कोकण रेल्वेबाबत बोलणं झालं. आमचं पुन्हा एकदा बोलणं झालं आणि त्यांनी मला नितीन गडकरींशीही एकदा बोलून घ्या असं सांगितलं. त्या दिवशी रात्रीच मी नितीन गडकरींना फोन केला. ते तेव्हा बंगळुरूला होते. त्यांनी तिकडून परत आल्यावर मला फोन केला.”

“१५-१६ वर्षे होऊनही कोकणाचा रस्ता का होत नाही?”

“गडकरींना मी सांगितलं की, मी आत्ताच कोकणातून आलो आणि मागील अनेक वर्षांपासून कोकणातील रस्त्यांची दुरावस्था आहे. समृद्धी महामार्गासारखा जास्त लांब महामार्ग अतिशय कमी कालावधीत होऊ शकतो, तर मग १५-१६ वर्षे होऊनही कोकणाचा रस्ता का होत नाही? असं मी त्यांना विचारलं,” अशी माहिती राज ठाकरेंनी दिली.

“गडकरी म्हणाले दोन कॉन्ट्रॅक्टर पळून गेले”

राज ठाकरे पुढे म्हणाले, “नितीन गडकरींना मी सांगितलं की त्यांनी व्यक्तिगत लक्ष घातल्याशिवाय तो रस्ता होणार नाही. त्यांनी मला सांगितलं की दोन कॉन्ट्रॅक्टर पळून गेले वगैरे. मी म्हटलं की, या झाल्या सरकारला माहिती असलेल्या गोष्टी. या सबबी जनतेला देऊ शकत नाही.”

हेही वाचा : विश्लेषण: मुंबई-गोवा महामार्गाचे काम का रखडले?

“गडकरी आठवडाभरात रस्त्याचं काम कधी सुरू होईल याची माहिती देणार”

“लोकांना रस्ता पाहिजे आहे. आज बघितलं तर सर्वजण पुणे मार्गे गोव्याला जातात, घाटमार्गाने कोकणात उतरतात. यावर त्यांनी तातडीने त्यात लक्ष घालून आठवडाभरात त्या रस्त्याचं काम कधी सुरू होईल याची माहिती देतो म्हणून सांगितलं,” असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray meet nitin gadkari devendra fadnavis over mumbai goa highway condition pbs