रेल्वे भरती मंडळाच्या परीक्षा केंद्रावर हल्लाबोल करून परीक्षार्थीना मारहाण केल्याप्रकरणी पाच वर्षांपूर्वी दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी वांद्रे महानगरदंडाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. हा हिंसाचार झाला तेव्हा आपण तेथे हजर नव्हतो आणि आपला या हिंसाचारामागे हात नसल्याचा दावा ठाकरे यांनी केला आहे.
दरम्यान, वारंवार समन्स बजावूनही गैरहजर राहिल्याबद्दल सोमवारी त्यांच्याविरुद्ध बजावलेले वॉरंट न्यायालयाने ते बुधवारी न्यायालयात हजर झाल्यानंतर रद्द केले. त्याच वेळी ठाकरे यांनी अर्ज करून आपल्याला या प्रकरणातून दोषमुक्त करण्याची विनंती न्यायालयाकडे केली. त्यांच्या अर्जावर न्यायालयाने पोलिसांना १ जुलैपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
नोव्हेंबर २००९ मध्ये पोलिसांनी ठाकरे आणि २० मनसे कार्यकर्त्यांवर आरोपपत्र दाखल केले होते. आरोपपत्रात या प्रकरणी एकूण ३१ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आल्याचे आणि त्यातील १४ हे महाराष्ट्रीय असल्याचे नमूद करण्यात आले होते. साक्षीदारांनी दिलेल्या जबाबानुसार, मनसे कार्यकर्त्यांनी वांद्रे येथील महाविद्यालयात असलेल्या परीक्षा केंद्रावर हल्लाबोल केला. सुरुवातीला त्यांनी निदर्शने दिली. नंतर त्यांनी परीक्षार्थीकडून प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका हिसकावून त्या फाडून टाकल्या. एवढेच नव्हे, तर काही परीक्षार्थीना मारहाण केली, अशी साक्ष काही जणांनी दिली.
रेल्वे भरतीची जाहिरात महाराष्ट्रातील वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याऐवजी ती उत्तर भारतातील वृत्तपत्रात प्रसिद्ध केल्याचा आरोप करीत मनसेने परीक्षा केंद्रावर हल्लाबोल करून परीक्षा उधळून लावली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा