Raj Thackeray on Amit Thackeray First Election: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आदित्य ठाकरेंनंतर ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारे ते दुसरे ठाकरे ठरले आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून महेश सावंत यांना तर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा काय घडलं होतं? याबाबत आता स्वत: राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे.
“आम्ही कधी गोष्टी लादल्या नाहीत”
राज ठाकरेंनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत भाष्य केलं. “आमच्या घरात बाळासाहेब असोत किंवा माझे वडील असोत. आम्ही काय करायचं वगैरे गोष्टी त्यांनी कधी आमच्यावर लादल्या नाहीत. त्यांनी आम्हाला हवं ते करण्याची मुभा दिली. अडचणी समजावून सांगितल्या. आमच्या घरात मी पुढच्या पिढीला असंच सांगतो. त्याला वाटत असेल तर त्यानं निवडणूक लढवावी. पण सगळ्या गोष्टींचा विचार करून हे करावं, हे मी त्याला सांगितलं”, असं राज ठाकरे म्हणाले.
“माझ्यापेक्षा अमितची आई जास्त काळजीत”
“मनसेचे बाकीचे उमेदवार जसे आहेत, तसाच अमित हादेखील माझ्यासाठी उमेदवार आहे. अविनाश आणि अमित हे माझ्यासाठी उमेदवार म्हणून सारखेच आहेत. यापलीकडे जाऊन तुम्ही फार काही करू शकत नाही. ४ तारखेपासून माझे दौरे सुरू होतील. मला सगळीकडे प्रचार करायचा आहे. प्रत्येक मतदारसंघात एक टीम काम करते आहे”, असंही राज ठाकरे म्हणाले. “या निवडणुकीसाठी माझ्यापेक्षा त्याची आई जास्त काळजीत आहे. पण ते होईल व्यवस्थित”, असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.
अमित ठाकरेंनी निवडणूक लढवायचं ठरवलं, तेव्हा काय घडलं?
“त्यानं निवडणूक लढवायची हे पक्षाच्याच नेत्यांच्या बैठकीत ठरलं. अमित म्हणाला की प्रत्येक नेत्यानं निवडणूक लढवायला हवी. त्या बैठकीत मी नव्हतो. पक्षानं जबाबदारी टाकली तर मीही निवडणूक लढवेन असं अमित म्हणाला. मी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर माझ्या एका बैठकीत लोक मला सांगायला लागले की अमितला भांडुपला उभं करायचं वगैरे. मग मला वाटलं की काहीतरी गंभीर घडतंय. मग मी आणि शर्मिला त्याच्याशी रात्री बोललो. आम्ही त्याला विचारलं की तू निवडणूक लढवण्यासाठी गंभीर आहेस का? तो मला म्हणाला ‘तुला वाटलं मी निवडणूक लढवावी तर मी लढवेन. तू म्हणाला महाराष्ट्र फिरावा तर तेही करेन. पण पक्षातल्या लोकांनी निवडणुका लढवल्या पाहिजेत असं माझं मत आहे’. मग मी त्याला निवडणूक काय असते, विधानभवन काय असतं, आत काय काय असतं हे समजावून सांगितलं. मग तो म्हणाला माझी तयारी आहे”, असं राज ठाकरेंनी सांगितलं.
विरोधी उमेदवारांबाबत राज ठाकरेंचं भाष्य
आदित्य ठाकरेंच्या पहिल्या निवडणुकीवेळी राज ठाकरेंनी त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. यंदा मात्र उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे या दोघांनी उमेदवार दिला. त्यावर राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. “मी आदित्यसाठी विचार केला होता की माझ्याविरोधातला पक्ष असला तरी राजकारण आणि नातेसंबंध हे मी वेगळं बघतो. मी लहानपणापासून त्या विचारात वाढलोय. मला तेव्हा असं वाटलं की वरळीत आदित्यच्या समोर उमेदवार नको उभा करूयात. हा माझा विचार झाला. मी जसा विचार करतोय, तसा सूज्ञ समोरचाही विचार करेलच अशी मी अपेक्षा नाही धरत. मी ती गोष्ट चांगल्या विचारानं केली. समोरच्याला तसं वाटलं तर त्यांनी करावी, नाहीतर करू नये”, असं राज ठाकरे म्हणाले.