बुलेट ट्रेनच्या मुद्दय़ावरून  राज ठाकरे यांचा हल्लाबोल

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोठय़ा संघर्षांनंतर महाराष्ट्राला मिळालेली मुंबई पुन्हा एकदा महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव शिजत आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा याच कारस्थानाचा मोठा भाग आहे, असा हल्ला चढवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकल्पावर टीका केली. एक लाख कोटी रुपयांच्या या प्रकल्पातील एकूण १२ स्थानकांपैकी आठ स्थानके गुजरातमध्ये आहेत. मुंबई-दिल्ली यांदरम्यानची वाहतूक जास्त असताना बुलेट ट्रेन फक्त अहमदाबादपुरतीच का, असा प्रश्नही त्यांनी केला.

जागतिक मराठी अकादमी व श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ यांच्या वतीने आयोजित जागतिक मराठी संमेलनाच्या समारोप सत्रात राज ठाकरे यांची मुलाखत झाली. ‘व्यंगचित्रकार’ राज ठाकरे यांची मुलाखत असल्याचे कार्यक्रम पत्रिकेत नमूद केले असले, तरी आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून व्यंगचित्रकलेला बाजूला सारून राजकीय विषयांचा परामर्शच जास्त घेण्यात आला. राज ठाकरे यांनी या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या नेहमीच्याच फटकेबाज शैलीत दिली. अरबी समुद्रातील शिवस्मारक ही फसवणूक असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. त्याचप्रमाणे दोन हजारांची नवी नोट आधी दहशतवाद्यांना पाहायला मिळाली आणि त्यानंतर आपल्याला तिचे दर्शन झाले, असे त्यांनी सांगताच प्रेक्षागारामध्ये हशा पिकला. ३१ डिसेंबर रोजी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणादरम्यान त्यांची देहबोलीच त्यांचा निश्चलनीकरणाचा निर्णय पूर्णपणे फसल्याचे सांगत होती, असेही राज म्हणाले.

भारतात व महाराष्ट्रात कलेबाबत कोणतेही ठोस धोरण नसून शालेय शिक्षणातच विद्यार्थ्यांमध्ये कलाभान जागवले पाहिजे, असे राज म्हणाले.

व्यंगचित्र ही चित्रकलेतील शेवटची पायरी!

व्यंगचित्र ही चित्रकलेची सुरुवात नसून ती शेवटची पायरी आहे. व्यंगचित्रे काढण्यासाठी वास्तवदर्शीपणा, प्रमाणबद्धता आदींचा अचूक अभ्यास लागतो. त्याचबरोबर न्यून हेरण्याची तिरकी नजर लागते. व्यंगचित्रात समोरच्याचे हावभाव अधिक अचूक टिपावे लागतात. त्यासाठी राजकीय संदर्भही माहीत करून घ्यावे लागतात. त्याचप्रमाणे व्यंगचित्रकार थोडासा नकल्या असेल, तर ती व्यंगचित्रे नक्कीच अधिक प्रभावी ठरतात, असे राज ठाकरे म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray on bjp