कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाचा दारूण पराभव केला. काँग्रेसच्या या विजयामागे राहुल गांधींपासून डी. के. शिवकुमार यांच्यापर्यंत अनेकांना श्रेय दिलं जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम झाला का? असा प्रश्न विचारला. यावेळी राज ठाकरेंनी प्रश्नाला होकार देत राहुल गांधींचं कौतुक केलं. ते रविवारी (१४ मे) अंबरनाथमध्ये आले असताना पत्रकारांशी बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, “राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम झालेला दिसतो. सगळ्या चॅनलवाल्यांनी, त्यांच्या मालकांनी राहुल गांधींची भारत जोडो यात्रा दाबण्याचा प्रयत्न केला, तरी त्या भारत जोडो यात्रेचा परिणाम लोकांमध्ये झालेला दिसतो.”
“भाजपाच्या स्वभावाचा आणि वागणुकीचा पराभव”
कर्नाटकातील पराभवावरून राज ठाकरेंनी भाजपालाही सुनावलं. ते म्हणाले, “मी मागे माझ्या भाषणात म्हटलं होतं की, विरोधी पक्ष हा जिंकत नसतो, तर सत्ताधारी हरत असतात. मला वाटतं हा पराभव स्वभावाचा पराभव आहे, वागणुकीचा पराभव आहे. आपलं कोण वाकडं करू शकतो अशा विचाराचा जो असतो त्याचा हा पराभव आहे, असं मला वाटतं.”
व्हिडीओ पाहा :
“जनतेला, लोकांना कधीही गृहित धरू नये”
“जनतेला, लोकांना कधीही गृहित धरू नये, हा बोध या निकालातून सर्वांनी घ्यावा,” असंही राज ठाकरेंनी नमूद केलं. कर्नाटक निकालाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार का? असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले, “कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून महाराष्ट्रातील निकालाबाबत लगेच सांगता येणार नाही.”
हेही वाचा : “कर्नाटकसाठी चांगलंच आहे की…”, भाजपाच्या पराभवानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
लोकसभेवर परिणाम होणार का?
लोकसभेवर परिणाम होणार का? या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, “लगेच सांगता येणार नाही. मी काही ज्योतिषी नाही.”