Raj Thackeray Speech : मुंबईत आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी राज्यभरातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्तांना संबोधित केले. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह शिंदे-फडणवीस सरकारवरही जोरदार टीका केली. तसेच त्यांनी मनसे आंदोनलं अर्धवट सोडते या आरोपावरही उत्तर दिले. ”टोलचा विषय हा मनसेने हाती घेतला होता. त्यानंतर अनेक अवैध टोल बंद झाले होते. आता सत्ता हातात द्या बाकीचे टोलही बंद करून देतो”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – राज ठाकरेंनी केलं नुपूर शर्मांचं समर्थन; झाकीर नाईकचा उल्लेख करत म्हणाले, “झाकीर नाईकच्या एका मुलाखतीत…”

काय म्हणाले राज ठाकरे?

“इतर राजकीय पक्ष स्वत: काहीही काम करत नाही आणि आपल्या पक्षाबाबत खोटा प्रचार करतात. याचं कारण या सगळ्यांना टोल वाल्यांकडून पैसे जातात. या अपप्रचाराला तुम्ही उत्तरं दिली पाहिजे. त्या-त्या पक्षातल्या राजकीय नेत्यांना टोलबाबत विचारलं पाहिजे. टोल बंद करणार असं शब्द या राजकीय पक्षांनी दिला होता. तरीही आज इतक्या वर्षानंतर मुंबई, पुणे, ठाण्यासह इतर ठिकाणी टोल सुरू आहेत. मात्र, हे लोकं टोलच्या आंदोलनाचं काय झालं? असं उलट आपल्याला विचारतात”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. तसेच ”हातात सत्ता द्या बाकी टोलही बंद करून देतो”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना खडसावलं; म्हणाले, “आजपर्यंत तुमचे खूप चोचले पुरवले, पण…”

टोलचं आंदोलन नेमकं काय होतं?

२०१३-१४ मध्ये राज्य अवैध टोलवसूली सुरू असल्याचा आरोप करत मनसेकडून आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात राज्यातील टोलनाक्यांची तोडफोड करण्यात आली होती. मनसेच्या या आंदोलनानंतर राज्यातील ६५ टोलनाके बंद करण्यात आले होते. दहा कोटींपेक्षा कमी खर्च असलेल्या रस्ते प्रकल्पांवरील टोलनाके बंद करणे, नवे पथकर धोरण जाहीर करणे, एसटी व बेस्टला टोलमधून वगळणे, कराराचा कालावधी संपलेले टोलनाके पाडून टाकणे, वाढत्या वाहानांच्या संख्येनुसार टोलचा दर कमी करणे, केंद्राच्या टोल धोरणानुसार टोलनाक्यांवर स्वच्छतागृहे, रुग्णवाहिका, क्रेन तसेच सर्व्हिस रोडच्या सुविधा निर्माण करणे, प्रकल्पाचे काम शंभर टक्के पूर्ण झाल्याशिवाय टोल आकारणी सुरु न करणे, कमी अंतरावरील टोल नाक्यांच्या वसुलीचा पश्न, टोल नाक्यांचे अंतर आदी मुद्दय़ांवर निर्णय घेण्याची मागणी करणारे निवेदनही राज ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना दिले होते.

Story img Loader