प्लॅनेट मराठी प्रस्तुत ‘अथांग’ वेब मालिकेच्या ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मोठं विधान केलं आहे. आपण अपघाताने राजकारणामध्ये आल्याचं राज यांनी अभिनेत्री तेजस्विनी पंडितला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी यावेळी त्यांच्या चित्रपटांच्या आवडीनिवडीबद्दल सांगताना हे विधान केलं आहे. जूहूमधील किंग्जमन हॉटेलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये राज यांनी त्यांची पहिली पसंती कोणत्या क्षेत्राला होती याबद्दलही भाष्य केलं.
नक्की वाचा >> “आपल्या देशात निवडणुका हा धंदा, ही झाली की ती, ती झाली की ती, त्यामुळे मला…”; राज ठाकरेंचं मुंबईतील कार्यक्रमात विधान
‘अथांग’च्या निमित्ताने राज यांनी एक छोटी मुलाखत या कार्यक्रमामध्ये दिली. यावेळी मनोरंजन सृष्टीशी संबंधित प्रश्न राज यांना विचारण्यात आले. अगदी आवडती ओटीटी सीरीज ते मराठी चित्रपट अशा अनेक विषयांवर राज यांनी भाष्य केलं. “मराठी चित्रपटांमध्ये, वेब सिरीजमध्ये किंवा मालिकांमध्ये प्रेक्षक म्हणून असं तुम्हाला काय वाटतंय जे थोडं कमी पडतंय? मराठी मालिका, वेब सिरीज प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही असं म्हटलं जातं. यावर तुम्हाला काय वाटतं?” असा प्रश्न मुलाखत घेणाऱ्या तेजस्विनीने विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरेंनी त्यांना चित्रपट पहायला प्रचंड आवडतं असं सांगितलं. “मी काही तज्ज्ञ नाही. मी चित्रपटांविषयी माझा एक अंदाज तुम्हाला देतो. माझ्या घरामध्ये एक ड्रोबो नावाचं मशीन आहे. या ड्रोबो मशिनमध्ये साडेआठ ते पावणेनऊ हजार चित्रपट आहेत. हे सर्व चित्रपट मी पाहिले आहेत,” असं राज म्हणाले.
तसेच राज यांनी आपण चित्रपट निर्मितीच्या दृष्टिकोनातून पाहतो असंही म्हटलं. यावेळेस राज यांनी एक मोठं विधान करताना आपण राजकारणात अपघाताने आल्याचं सांगत पहिलं प्रेम हे चित्रपट निर्मिती असल्याचंही म्हटलं. “मी राजकारणामध्ये खूप अपघाताने आलो. माझं पाहिलं पॅशन हे फिल्म मेकिंग (चित्रपट निर्मिती) हे आहे. त्यामुळे चित्रपट मी त्या दृष्टिकोनातून पाहतो. मी बरेचसे मराठी चित्रपट पाहत असताना मला खूप घाईगडबडीत केल्यासारखे वाटतात,” असं राज म्हणाले.
“मराठी चित्रपटांमध्ये बऱ्याच प्रमाणात स्क्रीन प्ले नावाची गोष्टच नसते. बऱ्याच प्रमाणात त्रूटी असतात. पण हे सरसकट म्हणता येत नाही. असे अनेक चित्रपट आहेत की ज्यामध्ये सर्वच उत्तम आहे. कास्टींग उत्तम आहे, बांधणी उत्तम आहे असे अनेक चित्रपट आपल्याकडे आलेत,” असं राज म्हणाले. तसेच भविष्यात नवीन पिढीने पुन्हा मराठीला आधीचा सन्मान मिळवून देताना मराठी चित्रपटांवरुन प्रेरणा घेऊन हिंदी चित्रपट बनतील असं काम करावं अशी इच्छा राज यांनी व्यक्त केली. “ज्याप्रकारे नवीन मुलं-मुली येत आहेत त्यांच्याकडून वेगळ्या प्रकारच्या नव्या गोष्टी पाहायला मिळतील. एके काळी अमराठी लोक मराठी नाटकांना येऊन हिंदी चित्रपट काढत. तो काळ पुन्हा यावा, असं मला वाटतं,” असं राज म्हणाले.