बेस्ट बस कर्मचाऱ्यांचा संपाचा आजचा आठवा दिवस होता. आजही या संपावर कोणताही तोडगा न निघाल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे राज ठाकरे यांनी बुधवारी होणाऱ्या बैठकीत मनसेला बाजू मांडण्याची परवानगी मागितली हे. मनसेकडून संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे प्रतिनिधीत्त्व करतील असंही या पत्रात म्हटलं आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकर आणि बेस्ट कर्मचारी त्रासले आहेत. यामधले विद्युत विभागातील कामगार हे आमच्या संघटनेतेचे सभासद आहेत. तसंच इतर कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी माझ्यावर विश्वास टाकून त्यांच्या मागण्या आपल्यासमोर मी मांडाव्यात आणि त्याला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली आहे.

मुंबई हायकोर्टाने बेस्ट कर्मचारी संघटनेने संपासंदर्भात उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत निर्णय घ्यावा असे म्हटले आहे. मागण्यांची कालबद्ध पद्धतीने पूर्तता करण्यात येईल मात्र संपाबाबत निर्णय घेण्यासाठी कोर्टाने कर्मचारी संघनेला सकाळी ११ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. अशात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या संपासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.