मुंबई : महाराष्ट्रात मोटारगाडय़ा किंवा लहान वाहनांना पथकरातून (टोल) २०१५ मध्येच वगळण्यात आले असून त्यांच्याकडून पथकर आकारला जात नाही, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून राज्यात सोमवारी वाद सुरू झाला आहे. फडणवीस धादांत खोटे बोलत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
आमचे कार्यकर्ते पथकर नाक्यांवर उभे राहून लहान वाहनांवर पथकर आकारणी होऊ देणार नाहीत. त्यांच्याकडून पथकर घेतला गेल्यास हे नाके जाळून टाकू, असा इशारा ठाकरे यांनी दिल्यावर राज्यात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि विविध पथकर नाक्यांवर आंदोलने केली.
हेही वाचा >>> MNS Protest on Toll : मनसे नेते अविनाश जाधव ताब्यात, टोल नाका आंदोलन प्रकरणी पोलिसांची कारवाई
मोटारींसारख्या लहान वाहनांना २०१५ मध्येच पथकरातून वगळण्यात आल्याचे वक्तव्य फडणवीस यांनी कोकणातील मंडणगड येथे बोलताना रविवारी केले होते. त्यावर महाराष्ट्रात प्रत्येक पक्षाने पथकरमुक्तीची घोषणा केली, मात्र काहीच केले नाही. तसेच टोल ठेकेदारांकडून नेतेमंडळींना पैसे दिले जातात, असा आरोपही ठाकरे यांनी केला. लहान वाहनांकडून पथकर घेतला जात असल्यास ते नाके पेटवून देत असल्याचा इशारा ठाकरे यांनी दिला. त्यानंतर मुलुंडसह राज्यात काही ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलने सुरू केली.
मनसेचे टोलनाक्यांवर आंदोलन
ठाणे, नवी मुंबई, पनवेल : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेतल्यानंतर ठाणे, ऐरोली, पनवेल भागांतील मनसेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह टोल नाक्यांवर पोहचले. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा आधार घेऊन टोल नाक्यावरून हलकी वाहने सोडण्यास सुरुवात केली. मनसेचे नेते अविनाश जाधव आणि त्यांच्या कार्यकर्ते आनंदनगर टोल नाक्यावर येणाऱ्या वाहनचालकांची भेट घेत होते. उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार हलक्या वाहनांना टोल नाही. त्यामुळे टोल भरू नका, असे आवाहन ते करीत होते. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. वाशी आणि ऐरोली या दोन्ही टोल नाक्यावरून मनसे पदाधिकाऱ्यांनी टोलविनाच वाहने सोडली. या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर पुन्हा टोल वसुली सुरू झाली. सोमवारी दुपारी जुन्या मुंबई – पुणे महामार्गावरील शेडुंग टोल नाक्यावर हलक्या वाहनांना सूट मिळावी, यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
काही पथकर नाक्यांवरच सूट – उपमुख्यमंत्री
फडणवीस यांच्या वक्तव्यावरून वाद सुरू झाल्याने त्यांच्या कार्यालयाकडून तातडीने स्पष्टीकरण करण्यात आले. राज्यात ३१ मे २०१५ रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडील ३८ पथकर नाक्यांपैकी ११ पथकर नाक्यांवर आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ५३ पैकी एका पथकर नाक्यावरील अशा एकूण १२ नाक्यांवरील पथकर वसुली बंद करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील उर्वरित २७ पथकर नाके तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या २६ पथकर नाक्यांवरील अशा एकूण ५३ पथकर नाक्यांवर कार, जीप व एसटी महामंडळाच्या बसेस अशा वाहनांना ३१ मे २०१५ रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून पथकरातून सूट देण्यात आली आहे. यासंदर्भात नुकसानभरपाई देण्याचा निर्णयही २०१७ मध्ये घेण्यात आला होता आणि त्याबाबतचा शासननिर्णय ३१ ऑगस्ट २०१७ रोजी जारी करण्यात आला, असे फडणवीस यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले. त्यामुळे राज्यातील काही पथकर नाक्यांवरच लहान वाहनांना पथकरातून सूट असून बहुतांश नाक्यांवर पथकर भरावाच लागणार आहे.