बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरून सुरू असलेल्या विरोधामागे जातीपातीचे गलिच्छ राजकारण असून या सगळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची फूस असल्याचा आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला. ते मंगळवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास विरोध करणाऱ्यांचा समाचार घेतला. बाबासाहेबांनी लिहलेल्या चरित्रात शिवाजी महाराजांचा आणि जिजाऊंचा अपमान झाला आहे, याची उपरती विरोधकांना ५० वर्षांनंतर कशी काय होते. शिवचरित्र खोटेच होते तर यापूर्वी काही जाहीर कार्यक्रमांमध्ये शरद पवारांनी स्वत: बाबासाहेबांचा सत्कार का केला, असे अनेक सवाल यावेळी राज यांनी उपस्थित केले. बाबासाहेबांनी लिहलेल्या शिवकालीन इतिहासाबद्दल काही आक्षेप असतील तर त्याबाबत चर्चा करा. मात्र, शिवचरित्रातील एखादे वाक्य वेगळे काढून संपूर्ण शिवचरित्रच खोटे ठरवणे अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांच्या रूपाने ब्राम्हण नेता आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने जातीपातीचे गलिच्छ राजकारण करण्यास सुरूवात केली आहे. खरे तर पुरंदरेंच्या पुरस्काराला विरोध सुरू झाल्यानंतर राज्य सरकारने याबाबतीत ठाम भूमिका घेतली पाहिजे होती. मात्र, भाजपमध्ये काही नेत्यांच्या रूपाने छुपी राष्ट्रवादी अस्तित्वात आहे आणि या सगळ्यांची सूत्रे शरद पवार हलवत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. शरद पवारांची फुस असल्यामुळेच राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये बाबासाहेबांना विरोध करण्याची हिंम्मत आली आहे. जातीचे राजकारण करून सत्ता मिळवायची, ही राष्ट्रवादीची आणि शरद पवारांची आजपर्यंतची कार्यपद्धती असल्याची खरमरीत टीकाही राज यांनी यावेळी केली. पुरंदरेंना पुरस्कार देण्यास विरोध करणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांच्यासह अन्य साहित्यिकांनाही राज ठाकरेंनी यावेळी खडे बोल सुनावले. भालचंद्र नेमांडेंची विद्वत्ता काय कामाची आहे. मुळात त्यांनी ज्ञानपीठ मिळाल्यानंतर कसे वागायचे याचे धडे विंदा करंदीकर आणि कुसुमाग्रजांकडून घेतले पाहिजे होते, असा टोला राज यांनी नेमाडेंना हाणला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा