एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समर्थन केलं आहे. मुंबईमध्ये पक्षाचा पदाधिकाऱ्यासंमोर दिलेल्या भाषणामध्ये राज यांनी भारतामधून फरार झालेल्या झाकीर नाईकचा उल्लेख करत नुपूर शर्मा यांचं समर्थन केलं आहे.
नक्की वाचा >> …अन् राज ठाकरेंनी हातानेच इशारा करत वसंत मोरेंना स्वत:च्या कारमध्ये बसण्यास सांगितलं; वसंत मोरे म्हणतात, “मी हो म्हटल्यानंतर…”
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना, “आजपर्यंत आपण जेवढी आंदोलनं केली तेवढी इतर कोणत्याही पक्षाने केलेली नाहीत,” असं म्हटलं. पुढे राज यांनी, “मशिदीवरचे भोंगे काढा भोंगे काढा किती वर्ष सुरु होतं. पण या भोंग्यांना आपण पर्याय दिला. एक तर भोंगे काढा किंवा आम्ही तिथे येऊन हनुमान चालिसा म्हणू. सगळ्यांनी भोंगे काढायला सुरुवात केली. आता मुस्लीम समाजातील अनेकजण सांगत आहेत की ते बरं वाटतं कानाला. असंख्य आंदोलनं झालेली आहेत. तुम्ही हे लोकांना सतत सांगितलं पाहिजे. तुम्ही कसले दबून राहता?” असा सवाल केला.
पुढे याच संदर्भातून राज यांनी नुपूर शर्मांसंदर्भातील वादावर भाष्य केलं. “त्या नुपूर शर्मा बोलल्या. त्यांना काढून काय टाकलं. माफी काय मागितली सगळ्यांची. मी बाजू घेतली त्यांची. त्या स्वत:च्या मनातलं बोलत नव्हत्या. जे होतं ते (बोलत होत्या)”, असं म्हणत राज यांनी नुपूर शर्मांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. तसेच पुढे राज यांनी भारतामधून फरार झालेला मुस्लिम धर्मोपदेशक आणि इस्लामिक रीसर्च फाउंडेशनचा संस्थापक झाकीर नाईकचा उल्लेख केला.
“तुमचा तो नाईक कोण? झाकीर नाईक त्याची मुलाखत बघा. झाकीर नाईक तर मुस्लमान आहे. झाकीर नाईकच्या एका मुलाखतीत त्याने तेच सांगितलं आहे जे नुपूर शर्मा बोलत होती,” असंही राज भाषणामध्ये म्हणाले. “झाकीर नाईकच्या बाबतीत काही नाही झालं त्याच्याबद्दल कोण काही बोललं नाही. त्याला कोणी सांगितलं नाही माफी मागा. ते बोलणं सोडून दिलं तुम्ही,” असं म्हणत राज यांनी नाराजी व्यक्त केली.
सर्व गुन्हे दिल्ली पोलिसांकडे वर्ग
नूपुर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर देशभरात दाखल झालेले विविध गुन्हे एकत्र करून दिल्ली पोलिसांना हस्तांतरित करण्याचे निर्देश दोन आठवड्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिले. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्या. पारदीवाला यांच्या खंडपीठाने दिल्ली पोलिसांतर्फे तपास पूर्ण झाल्यानंतर नूपुर शर्माना अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने नूपुर शर्मा यांना त्यांच्याविरुद्ध दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयाकडे दाद मागण्यास परवानगी दिली. त्यावेळीच हेही स्पष्ट केले, की भविष्यात शर्माविरुद्ध दाखल होणारे गुन्हे दिल्ली पोलिसांकडे हस्तांतरित केले जातील. या सर्व गुन्ह्यांचा तपास ‘इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन’अंतर्गत करण्यात येईल. त्यामुळे इतर पोलिसांकडून या गुन्ह्यांचा समाधानकारक तपास करण्यासाठी सहकार्य मिळवणे दिल्ली पोलिसांना सोपे जाईल.
खंडपीठाने स्पष्ट केले, की याचिकाकर्त्यां शर्मा यांच्या जीवितास आणि सुरक्षेस धोका असल्याची न्यायालयाने दखल घेतली आहे. त्यामुळे शर्माविरुद्धचे सर्व गुन्हे एकत्रित करून दिल्ली पोलिसांकडे वर्ग करावेत. या विशिष्ट परिस्थितीत, आम्ही या प्रकरणांचा तपास दिल्ली पोलिसांनी करणेच योग्य समजतो. याचिकाकर्ता शर्मांना सध्याचे आणि भविष्यात दाखल होणारे गुन्हे रद्द करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे स्वातंत्र्य आहे, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.