मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत ‘वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे’, असे सांगत आपले चुलत बंधू आणि शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर टाळीसाठी हात पुढे केला. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही टाळी देण्याची ‘सशर्त’ तयारी दाखविली. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या मनोमीलनाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा रंगली आहे.

‘महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासमोर आमची भांडणे, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणे आणि एकत्र राहणे, यात काही कठीण आहे असे वाटत नाही,’ असे सांगत राज ठाकरे यांनी शनिवारी उद्धव ठाकरे यांना साद घातली.

अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या यूट्यूब वाहिनीवरील ‘वास्तव मे ट्रुथ’ या पॉडकास्ट कार्यक्रमात राज ठाकरे यांनी ‘ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का’ या प्रश्नावर महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत आपण सकारात्मक असल्याचे सांगत नव्या राजकीय चर्चेला तोंड फोडले. अर्थात, शिवसेनेकडूनही तसा प्रतिसाद मिळायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भाजपबरोबर जाणे राजकीय होईल, सर्वच भूमिका जुळतील असे नाही. उद्या एकमेकांना हात जोडले जातील, हात मिळवले जातील, नमस्कार केला जाईल. राजकारणात सर्वच गोष्टींना वेग आला आहे. कधी काय घडेल सांगता येत नाही, असे सांगत राज यांनी भाजपबरोबर युतीबाबतही सकारात्मकता दाखविली. महाराष्ट्र हडपण्याचा प्रकार चारही बाजूंनी सुरू आहे. त्यावर आपण जेव्हा बोलू तेव्हा हे सर्व पक्ष किती साथ देतील माहीत नाही. मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. तो एकत्र यायला लागला तर त्याला जातीत विभागले जाते. तो एकत्र येणारच नाही हे बघितले जाते. महाराष्ट्राच्या बाबतीत हे षड्यंत्र सुरू आहे, असा आरोपही राज यांनी केला.

एकनाथ शिंदे बाहेर जाणे आणि आमदारांना घेऊन जाणे हा एक वेगळ्या राजकारणाचा भाग आहे. आपण शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हाही आमदार आणि खासदार आले होते. आपल्यालाही शिंदेंसारखे सर्व करणे शक्य होते. बाळासाहेब सोडून कुणाच्याही हाताखाली काम करणार नाही, हा विचार घेऊन आपण बाहेर पडलो. पण शिवसेनेत होतो तेव्हा बाळासाहेब आणि उद्धव होते. उद्धवबरोबर काम करायला आपली काही हरकत नव्हती, असा दावाही त्यांनी केला.

मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आपण किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला तयार आहोत. आपल्याकडून कोणतेच भांडण नव्हते आणि असतील तर आजच मिटवून टाकतो, असे सांगत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना लगेचच सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र महाराष्ट्र हिताच्या आड येणाऱ्यांचे स्वागत करणार नाही. हे पहिले ठरवा, मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा, अशी अटही त्यांनी घातली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी स्नेहभोजन केले. राज ठाकरे यांनीच त्यांना आमंत्रित केले होते. मात्र पॉडकास्टवरील मुलाखतीत राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची तयारी दर्शविली. हे दोन्ही धागे पकडून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र कामगार सेनेच्या कार्यक्रमात आपली भूमिका स्पष्ट केली. सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचे आवाहन करतो, पण एक अट आहे. जेव्हा आम्ही लोकसभेला सांगत होतो, हे सगळे उद्याोग घेऊन गुजरातला जात आहेत, तेव्हाच विरोध केला असता तर महाराष्ट्र हिताचे सरकार केंद्रात आणि राज्यात बसवू शकलो असतो, असे सांगताना उद्धव ठाकरे यांनी लोकसभेला मनसेने भाजपला दिलेल्या पाठिंब्याची आठवण करून दिली. तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची असे चालणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र हित हीच माझी अट आहे. चोरांना पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही, ही पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्यायची आणि मग टाळी देण्याची हाळी द्यायची. कोणाबरोबर जाऊन महाराष्ट्र, मराठी आणि हिंदुत्वाचे हित होणार आहे ते आधी ठरवा. – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख शिवसेना (ठाकरे)

एकत्र येणे, एकत्र राहणे, ही कठीण गोष्ट नाही. एकत्र येण्याबाबत विषय फक्त इच्छेचा आहे. हा माझ्या इच्छेचा आणि स्वार्थाचा विषय नाही. याकडे व्यापकतेने बघणे गरजेचे आहे. राज्याच्या हितासाठी सगळ्याच पक्षांतील मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा. – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

एकत्र आले तर आनंदच – फडणवीस

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जुने मतभेद विसरून एकत्र येत असतील तर त्यात वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. उलट एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्याच वेळी, दोघे एकत्र येण्यासाठी जरा वाट बघा. माध्यमच त्यावर अधिक विचार करताना दिसतात. कोणी प्रस्ताव दिला, कोणी त्यावर अटी घातल्या यावर मी काय प्रतिक्रिया देणार. त्यांनाच विचारा, अशी पुष्टीही मुख्यमंत्र्यांनी जोडली.