मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यातील दोन प्रमुख नेते एकत्र येणार, अशी चर्चा शनिवारपासून सुरू झाल्यानंतर या पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले. दोन्ही ठाकरेंच्या नेत्यांमध्ये जुंपलेली पाहून राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. राज सध्या परदेशात आहेत. ते परत आल्यानंतर २९ एप्रिलला आपली भूमिका मांडणार असल्याचे मनसेच्या नेत्यांनी सांगितले.
महाराष्ट्र आणि मराठीच्या हितासमोर आमचे वाद, भांडणे हे अतिशय क्षुल्लक आहे. आम्ही एकत्र येणे कठीण वाटत नाही, असे मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका संवाद कार्यक्रमात व्यक्त केले. महाराष्ट्राच्या हितासाठी आपणही किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला तयार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर करून राज ठाकरे यांना ‘टाळी’ देण्याची तयारी दाखवली.
महाराष्ट्र हिताच्या आड येणाऱ्यांशी हातमिळवणी करणार नाही हे अगोदर ठरवा, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी दिला होता. राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या टाळी प्रतिटाळीनंतर राज्यात दोन्ही नेते व त्यांचे पक्ष एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली. परंतु त्यांचे नेते मात्र एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले. परंतु राज ठाकरे यांनी परदेशातून आपल्या नेत्यांना शांत राहण्याच्या सूचना केल्या. २९ एप्रिलनंतर ते भूमिका मांडणार असल्याचे मनसे नेते देशपांडे यांनी सांगितले.