* सरसकट राजीनामे स्वीकारले
विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत सामूहिक राजीनामा देण्याच्या नाटय़ाला मंगळवारी वेगळीच कलाटणी मिळाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरसकट सर्वाचे राजीनामे स्वीकारत राजीनामा देणाऱ्यांना धक्का दिला. सध्याच्या परिस्थितीत आपल्यासोबत कोण आहे, हेही यामुळे कळेल असा आक्रमकपणाही त्यांनी दर्शविला आहे.
माजी आमदार वसंत गिते व त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांचे दिलेले राजीनामे स्वीकारले गेले असले तरी महापालिकेतील काही अपवादात्मक नगरसेवक वगळता कोणी गिते यांच्या पाठीशी उभे राहण्याच्या मनस्थितीत नाही. यामुळे मोठय़ा प्रमाणात नगरसेवक फुटतील ही शक्यताही फोल ठरली आहे.
विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पाश्र्वभूमीवर, मनसेचे माजी आमदार वसंत गिते यांनी सरचिटणीसपदाचा तर त्यांचे समर्थक जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष व नगरसेवक आदींनी सामूहिक राजीनामा देत पक्षाच्या बालेकिल्ल्यास हादरा देण्याचा प्रयत्न केला. खुद्द गिते यांनी आपण पक्षात राहणार असल्याचे म्हटले असले तरी भाजप व शिवसेनेच्या नेत्यांकडून गिते हे आपल्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत असून त्यांच्या भेटीगाठी घेत
आहेत.
पराभवाची कारणिममासा करण्यासाठी राज हे नियोजित दौऱ्यानुसार बुधवारपासून तीन ते चार दिवस नाशिकमध्ये येण्याचे ठरले आहे. परंतु आता त्यांचा दौराही अनिश्चित झाला आहे.
गिते पक्षांतर करणार असल्याची जोरदार चर्चा असली तरी महापालिकेतील सर्व नगरसेवकांनी बिकट स्थितीत पक्षासोबत राहणार असल्याचे आपणांस सांगितले आहे, अशी माहिती महापौर अशोक मुर्तडक यांनी दिली. यामुळे गिते यांच्यासोबत कोणी नगरसेवक नसल्याचे दर्शविले जात आहे.
गिते यांच्या राजीनाम्यामुळे त्यांच्या विरोधी गटास बळ मिळाले आहे. वरकरणी पक्षात सर्व आलबेल असल्याचे दर्शविले जात असले तरी गिते यांनी पक्ष सोडल्यास ही बाब त्यांच्या विरोधी गटाच्या पथ्यावर राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पराभव, महापालिकेतील एकूणच कामकाज, यामुळे सहन करावी लागणारी नाराजी, रखडलेली विकास कामे अशा विविध विषयांवर राज यांचा दौरा झालाच तर चर्चा होणे अपेक्षित आहे. राज यांची मुलगी उर्वशी अपघातात जखमी झाल्यामुळे बुधवारच्या दौऱ्याबद्दल अद्याप स्पष्टता झाली नसल्याचे  प्रवक्त्या शर्वरी लथ यांनी
सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा