Raj Thackeray On MNS : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आतापासून जोरदार तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षसंघटनेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच मनसेच्या पक्षसंघटनेला बळकटी देण्याच्या पार्श्वभूमीवर आता पक्षाच्या संघटनेत काही महत्वाचे बदल देखील करण्यात आले आहेत. मनसेच्या केंद्रीय समितीची स्थापना करत मुंबई आणि ठाणे शहरातील पदाधिकाऱ्यांवर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच यावेळी मनसेत काही नवीन पदांची घोषणा करत ही जबाबदारी काही पदाधिकाऱ्यांवर राज ठाकरे यांनी सोपवली आहे. यामध्ये मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी संदीप देशपांडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच अमित ठाकरे यांच्यावर मनसेच्या सर्व शाखाध्यक्षाची जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

“मुंबईत आम्ही पक्षसंघटनेत काही पदरचना केलेल्या आहेत. यामध्ये पहिल्यांदाच शहराध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष नेमण्यात आले आहेत. आतापर्यंत पक्षात फक्त विभाग अध्यक्ष हे पद होतं. पण आता शहराध्यक्ष एक आणि उपशहराध्यक्ष तीन नेमण्यात आले आहेत. संदीप देशपांडे यांच्यावर मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. कुलाबा ते माहीम आणि कुलाबा ते शीव या विभागाची जबाबदारी यशवंत किल्लेदार यांच्याकडे देण्यात आली आहे. पश्चिमेकडच्या विभागाची जबाबदारी कुणाल माईनकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे, तसेच पूर्वेकडच्या विभागाची जबाबदारी योगेश सावंत यांच्याकडे देण्यात आलेली आहे. आता या पदाधिकाऱ्यांनी कोणत्या चौकटीत काम करायचं? याची सर्व माहिती त्यांना दिली जाईल”, असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

“आम्ही एक केंद्रीय समिती नेमलेली आहे. ही केंद्रीय समिती प्रत्येक घटकांकडे बारकाईने लक्ष ठेवेल. या केंद्रीय समितीमध्ये पक्षातील काही नेत्यांची नियुक्ती केली आहे. या केंद्रीय समितीच्या गटाध्यक्षपदाची जबाबदारी बाळा नांदगावकर यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच नितीन सरदेसाई यांच्याकडे विभाग अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. अमित ठाकरे यांच्याकडे मनसेच्या सर्व शाखाध्यक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. या यादीमध्ये अनेक लोक आहेत. अशाच प्रकारची रचना ठाणे शहरात देखील केलेली आहे. ठाण्यात देखील केंद्रीय समिती केली आहे. या समितीत अविनाश जाधव हे एक जबाबदारी पाहतील, अभिजीत पानसे हे एक जबाबदारी पाहतील तसेच राजू पाटील हे एक जबाबदारी पाहतील”, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.

संदीप देशपांडे काय म्हणाले?

मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर संदीप देशपांडे यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. ते म्हणाले, “मला असं वाटतं मनसेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई शहर अध्यक्षपद निर्माण केलंय. त्यामुळे आनंद तर आहेच, पण जबाबदारी असल्याने टेन्शनही आहे. जिद्दही आहे की एक चांगला परफॉर्मन्स येणाऱ्या महापालिका निवडणुकीत दिसेल. आजपासून मिशन मुंबई महापालिका सुरुवात झाल आहे.तसंचयेणाऱ्या सहा महिन्यात मनसेचं वेगळंपण दिसेल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.