राज ठाकरे यांनी महायुतीमध्ये आले पाहिजे, असे गेल्या आठवड्यात म्हणणाऱया रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवारी या विषयावर घुमजाव केले. राज ठाकरे यांनी महायुतीमध्ये आल्यामुळे फार फायदा होणार नाही, असे माझे पहिल्यापासून मत होते आणि आजही मी माझ्या मतावर ठाम असल्याचे आठवले यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायचे की नाही, हे ठरविण्याचा अधिकार मला नाही. एकत्र यायचे का, हे त्यांनीच ठरवायला हवे. मला तरी ते एकत्र येतील, असे वाटत नसल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात २६ मे रोजी एका सभेमध्ये बोलताना आठवले यांनी राज ठाकरे यांना महायुतीमध्ये येण्याचे आवतण दिले होते. मात्र, त्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखामध्ये आठवले यांच्यावर खरपूस टीका करण्यात आली होती.