विधानसभा निवडणूक निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे जणू काही अज्ञातवासातच गेले आहेत. ‘संपूर्ण सत्ता हाती द्या’, असे आवाहन करणा-या राज ठाकरेंच्या पक्षाची मतदारांनी केवळ एका आमदारावर बोळवण केली आणि आणि मनसेचा बुडबुडा लोकसभेनंतर पुन्हा एकदा फुटला. मतदारांनी मनसेला झिडकारल्यानंतर मरगळ आलेल्या पक्षनेतृत्त्वावर विश्वास दाखवण्यासाठी राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ‘कृष्णकुंज’ येथे शनिवारी येणार असल्याची चर्चाही होती. मात्र, कार्यकर्त्यांनी शनिवारी ‘कृष्णकुंज’वर येऊ नये. आपण त्यादिवशी नगर जिल्ह्यातील जवखेडे येथे जाणार असल्याचा संदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला आहे. व्हॉट्सअप आणि फेसबुकवर पुढील संदेश मोठ्या प्रमाणात फिरतो आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील माझ्या सहकारी मित्रांनो,

दिनांक १ नोव्हेंबरला तुमच्यापैकी काहीजण मला येऊन भेटणार होते आणि आपण कामाला लागलो आहोत असं सांगणार होते हे मला समजलं. तुम्ही याल आणि मी नसेन असं व्हायला नको म्हणून मुद्दाम कळवतो आहे. त्यादिवशी मी मुंबईत नाही. मी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी जवळ असणार आहे. मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की माझ्या पर्यंत तुम्हा सर्वांच्या भावना पोचल्या आहेत. तुमचं माझ्याविषयीचं आणि पक्षाविषयीचं प्रेमही पोचलं आहे. त्याबद्दल शतश: धन्यवाद. माझं काम सुरू आहेच. आपल्या सर्वांच्या भेटीगाठीही सुरु आहेत. तुम्हीही जिथे आहात तिथे पक्षाचं काम वाढवावं, पक्षाचा विचार घराघरात न्यावा आणि लोकांशी संपर्क ठेवावा, तो वाढवावा. मी आपल्याला भेटणार आहेच, फक्त त्यादिवशी कामानिमित्त बाहेर आहे आणि तुम्ही आलात आणि मी नाही असं व्हायला नको म्हणून कळवलं.

जय महाराष्ट्र !!!


आपला …

राज ठाकरे

Story img Loader