उत्सवांचं बाजारीकरण थांबवा असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. दहीहंडी उत्सव समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत राज ठाकरेंची भेट घेतली त्यावेळी त्यांनी हा सल्ला दिला आहे. बाजारीकरण आणि भपकेबाजी थांबवलीत तर आयोजनावर कुणीही कोणताही आक्षेप घेणार नाही असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. गणेशोत्सव असो, दहीहंडी किंवा नवरात्र त्यामध्ये डीजे, सेलिब्रिटी, लाऊडस्पीकर यांचा वापर करू नका असाही सल्ला राज ठाकरेंनी दिला आहे.
ढोल ताशांच्या पारंपरिक गजरात दहीहंडी साजरी करा अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली आहे. समन्वय समितीच्या सदस्यांनी दहीहंडी उत्सवाच्या आयोजनावर लादण्यात आलेले निर्बंध आणि न्यायालयात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईची माहिती राज ठाकरेंना दिली. दहीहंडीपर्यंत नियमात बदल झाला नाही तर राज्य सरकारकडून विशेष अध्यादेश काढला जाईल हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. गणेशोत्सव आणि दहीहंडी याबाबत ज्या अटी आहेत त्यासंदर्भातल्या कायद्यात बदल करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पारंपरिक सण साजरे होणारच, त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या दिल्या जाव्यात असे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्र या सगळ्या सणांना इव्हेंटचे रूप आले आहे. दहीहंडीच्या वेळी थरांचा थरार, डी.जे. आणि अभिनेते अभिनेत्रींची हजेरी हे सगळे पाहायला मिळते आहे, या सगळ्यातून परंपरा कुठेतरी हरवली जाऊन फक्त इव्हेंट उरला आहे. गणेशोत्सवादरम्यानही असेच प्रकार बघायला मिळतात. त्यामुळे राज ठाकरे यांनी या सगळ्याचे बाजारीकरण थांबवा आणि पारंपरिक पद्धतीने सण साजरे करा अशी भूमिका घेतली आहे.