शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकार देर आए, पर दुरुस्त आए अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. बाबासाहेबांना पुरस्कार जाहीर होणे ही खूप आनंदाची बाब आहे. बाबासाहेब पुरंदरे यांचे मी अभिनंदन करतो असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
बाबासाहेब पुरंदरे आणि राज ठाकरे यांच्यात अत्यंत जिव्हाळयाचे संबंध आहेत. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राज ठाकरेंनी फोन करुन बाबासाहेबांचे अभिनंदन केले. आपल्याला मिळालेल्या पुरस्कारामुळे राज ठाकरेंनाही प्रचंड आनंद झाला आहे असे बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितले.
पद्मविभूषण पुरस्कार जाहीर होणे हा आपल्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. आनंद इतका आहे की तो शब्दात व्यक्तही करता येत नाही अशा भावना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बाबसाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केल्या.
गेल्या ५० वर्षात जे शिवचरित्र नव्याने उमगलय कागद किंवा जे नवं काही सापडलय ते वाचक, अभ्यासकांच्या पुढे ठेवावं अशी इच्छा आहे. या क्षणाला मला माझ्या वडिलांची आणि गुरुंची आठवण येत आहे. जे त्यांनी शिकवलं, वेळच्या वेळी रागावले त्याचा फायदा झाला त्याच श्रेय हे त्यांनाच आहे असे बाबासाहेब म्हणाले.