बाल दिनाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी लहान मुलांशी संवाद साधला. यावेळी लहान मुलांनी राज ठाकरेंना त्यांचे बालपण, शालेय जीवनाबद्दल अनेक प्रश्न विचारले. एबीपी माझा वृत्त वाहिनीने ‘ऐसपैस गप्पा, राज काकांशी’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी एका मुलाने सचिन तेंडुलकर तुमचे मित्र आहेत. त्यांच्याकडून तुम्हाला कुठली गोष्टी शिकायला आवडेल असा प्रश्न विचारला.
त्यावर राज ठाकरेंनी शिस्त असे उत्तर दिले. सचिन तेंडुलकरला आपण सर्वांनी पाहिले आहे. सचिन तेंडुलकरने यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. आज क्रिकेटमधून तो निवृत्त झाला असला तरी शिस्त पाळतो असे राज यांनी सांगितले. शाळेत असतानाही तुम्ही अन्यायाविरुद्ध लढणारे होता का ? या प्रश्नावर राज यांनी शाळेत मी तसा नव्हतो. शाळेत शिक्षकांपासून शक्य तितका लांब पळायचो. शिक्षकांचा मारही खाल्ला आहे असे उत्तर दिले.
कोणाची मुलाखत घ्यायला आवडेल ? या प्रश्नावर त्यांनी बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर असे सांगितले. शरद पवारांची मुलाखत अलीकडेच घेतली असे ते म्हणाले. आवडता सुपरहिरो कोणता ? या प्रश्नावर राज यांनी सुपरमॅन असे उत्तर दिले. शाळेत असताना सुपरमॅनचाच पहिला प्रभाव पडला असे ते म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही व्यंगचित्रामध्ये त्यांना जास्त लठ्ठ दाखवता अशी तक्रार करतात. त्यावर राज म्हणाले की, व्यंगचित्र काढताना मला समोर जे दिसतं तसचं चित्र काढतो. फडणवीसांच पोट जास्त दिसतं तर चित्र सुद्धा तसचं येणार असे राज म्हणाले. काळाचे चक्र मागे जाणार असेल तर आपल्याला शिवाजी महाराजांना भेटायला आवडेल असे त्यांनी सांगितले.