सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी रेखाटलेल्या व्यंगचित्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, आलोक वर्मा आणि उद्योगपती अनिल अंबांनी यांना दाखवले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याप्रमाणेच राज ठाकरेंनी सुद्धा राफेल घोटाळयाच्या चौकशीमुळे आलोक वर्मा यांना पदावरुन दूर केल्याचा आरोप केला आहे.
आलोक वर्मा यांना राफेल घोटाळया प्रकरणी अनिल अंबानी यांची चौकशी करायची होती. त्यासाठीच मोदी यांनी त्यांना तात्काळ पदावरुन दूर केल्याचे राज ठाकरेंनी व्यंगचित्रात दाखवले आहे. सीबीआयमधील अंतर्गत गृहयुद्धावरुन सध्या देशातील राजकारण तापले असून विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे.
सीबीआयमधील नंबर १ अधिकारी आलोक वर्मा आणि नंबर २ अधिकारी राकेश अस्थाना यांच्यातील अंतर्गत संघर्षातून या वादाला सुरुवात झाली. आलोक वर्मा यांनी राकेश अस्थानांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर हा वाद विकोपाला गेला. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास केंद्र सरकारने दोघांना सक्तीच्या रजेवर पाठवले. त्यामुळे या प्रकरणात संशय अधिक वाढला.
सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून सर्वोच्च न्यायालयाने दोन आठडयांच्या आता आलोक वर्मा यांची चौकशी पूर्ण करण्याचे आदेश केंद्रीय दक्षता आयोगाला दिले आहेत. शुक्रवारी काँग्रेसने या मुद्यावरुन देशभरात जोरदार आंदोलन केले. आता राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्रातून निशाणा साधला आहे.