जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या थंडा कारभारामुळे जेएनपीटीचा धंदा गेल्या काही वर्षांमध्ये मंदावला असून हा सर्व व्यवसाय गुजरातकडे वळत असल्याबद्दल नराजी व्यक्त करत यात वेळीच सुधारणा न केल्यास मनसेला आंदोलन करावे लागेल, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जेएनपीटीच्या अध्यक्षांना पत्राद्वारे दिला आहे.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या रविवारी झालेल्या सभेच्या पाश्र्वभूमीवर मनसेच्या कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण व पालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांनी राज यांचे पत्र जेएनपीटीच्या आयुक्तांना सोमवारी दिले. मोदी यांनी महाराष्ट्राच्या कारभारावर टीका करताना गुजरातने कसा विकास केला याचे दाखले दिले होते. राज यांनी पत्रातून दगडात दोन पक्षी मारल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. जेएनपीटीमधील व्यवसाय गुजरातमधील गोदीमध्ये जावा यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न होत असल्याचा आरोप राज यांनी केला आहे.
तसेच जेएनपीटीचा विकास करणाऱ्या एनएसआयसीटी व जीटीआय या खाजगी कंपन्यांनी गुजरातमधील मुंद्रा व पिपावा या दोन बंदरांचा विकास केला असून तेथील व्यवसाय वाढावा यासाठी या कंपन्यांकडून आधुनिकीकरणाच्या कामात विलंब करण्यात येत असल्याचे राज यांचे म्हणणे आहे. येथील चौथ्या टर्मिनलचे काम वेळेत न झाल्याने ज्या पिपावा व मुंद्रा बंदरात २००३ साली १३ हजार कंटेनर उतरले होते तेथे २०१२ साली सात लाख कंटेनर उतरले. गुजरातकडे वळलेल्या या व्यवसायामुळे महाराष्ट्राचे काहीशे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. चौथ्या टर्मिनलचे काम वेळेत झाले असते तर हा व्यवसाय महाराष्ट्रातच राहिला असता असे सांगून टर्मिनलचे काम लवकर करावे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.