राज ठाकरे यांची भूमिका; सरकार न्यायालयीन आदेशाच्या अंमलबजावणीस सज्ज
आतापर्यंत दहीहंडी ज्या धूमधडाक्यात साजरी होत होती तशीच ती यावेळीही साजरी होईल असे सांगत उंचीच्या बंधनाचा प्रश्नच येत नाही, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. मनसेच्या कार्यकर्त्यांना तसेच दहीहंडी मंडळांना पोलिसांकडून नोटिसा देण्यात येत आहेत. सरकारनेही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची भूमिका मांडली आहे. याबाबत विचारले असता सरकार आपले काम करेल आम्ही आमची दहीहंडी आमच्या पद्धतीनेच साजरी करू असे राज यांनी सांगितले.
दहीहंडीच्या उंचीवर र्निबध घालण्यापूर्वी न्यायालयाने दहीहंडी मंडळांची बाजू ऐकून घेणे आवश्यक होते. सुरक्षेची सर्व बंधने पाळून योग्य प्रकारे उंचावरची दहीहंडी फोडता येते. वीस फूट बंधन घातल्याने अपघात होणार नाही, याची खात्री कोण देऊ शकते, असा सवाल करत देशात लोकशाही आहे मोगलाई नाही, असे सांगून राज यांनी पुन्हा न्यायालयावर आगपाखड केली.
रस्त्यावर मोठी स्टेज बांधून वाहतूक अडवणे, डीजे लावणे, नटनटय़ांना बोलावून नाचवणे असल्या प्रकारांना आपला पहिल्यापासून विरोध होता. आताही ‘समन्वय समिती’च्या पदाधिकाऱ्यांना माझी ही भूमिका मी सांगितली आहे. पारंपरिक पद्धतीने मोठय़ा उत्साहात हा सण साजरा करा मनसे तुमच्या मागे आहे, ही माझी स्पष्ट भूमिका आहे, असे राज यांनी सांगितले.
एकीकडे भाजप मुंबईचे अध्यक्ष आशीष शेलार हे न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून गोविंदा साजरा करण्यावर भर देत आहेत, तर दुसरीकडे राज यांनी उंचीचे बंधन झुगारून गोविंदा साजरा करण्याची भूमिका घेतली आहे. या पाश्र्वभूमीवर सरकारकडून न्यायालयाच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली गेल्यास भाजपला गोविदांची नाराजी स्वीकारावी लागणार असून त्याचा परिणाम महापालिका निवडणुकीत होईल, अशी भीती भाजप पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
गोविंदा मंडळांमध्येही अस्वस्थता असून ‘गोविंदा समन्वय समिती’च्या सदस्यांनी मंगळवारी राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली असता दहीहंडीचे आयोजन करणाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य काळजी घेतली पाहिजे, सेफ्टीबेल्टपासून रुग्णवाहिकांची व्यवस्था केली पाहिजे असे राज यांनी सांगितले.
ठाणे शहर मनसेचे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी मात्र आपण नऊ थरांची हंडी लावणार अशी भूमिका घेतली आहे. ठाण्यातील भगवती मैदानात मनसेची हंडी लावण्यात येणार असून सुरक्षेची सर्व काळजी घेतली जाईल, असे जाधव यांनी सांगितले.
मुंबई पोलिसांची बैठक
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवाविषयी दिलेल्या निर्देशांचे पालन चोखपणे करण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना मुंबई पोलिसांना देण्यात आल्या आहेत. गुरुवारी होणाऱ्या दहीहंडीच्या पाश्र्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी सायंकाळी बोलावण्यात आली होती. दरम्यान, कोर्टाच्या आदेशाचे पालन करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशा आशयाच्या नोटिसाही पोलिसांनी मंडळांना बजावल्या आहेत.
जय जवान मंडळ उच्च न्यायालयात
मुंबई : शेवटच्या क्षणी वरच्या थरासाठी १८ वर्षांवरील गोविंदा सापडत नसल्याचा दावा करत जोगेश्वरी येथील ‘जय जवान’ गोविंदा मंडळाने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत यंदाच्या वर्षी ही अट शिथिल करण्याची विनंती केली आहे. त्यावर बुधवारी सुनावणी होणार आहे. तर दहिहंडीदरम्यान न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले जाते की नाही हे पाहण्यासाठी स्थानिक पातळीवर सरकारने समितीच नियुक्त केलेली नसल्याचा दावा करत स्वाती पाटील यांनी उच्च न्यायालयात पुन्हा धाव घेतली आहे.