राज्यपाल कोश्यारींसह भाजपा नेत्यांनी शिवरायांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांविरोधात आज महाविकास आघाडीकडून महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल’ या घोषवाक्याखाली महाविकास आघाडी आज रस्त्यावर उतरणार आहे. तर महाविकास आघाडीच्या मोर्च्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाच्यावतीने ‘माफी मांगो’ आंदोलन करण्यात येत आहे. तसेच सुषमा अंधारेंविरोधात शिंदे गटाकडून ‘ठाणे बंद’ची देखील हाक देण्यात आली आहे. दरम्यान, यावरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही सरकारमध्ये असताना बंद करता, याची तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, असेही ते म्हणाले. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले राजन विचारे?
“महाविकास आघाडीचा महामोर्चा असल्याने मिंधे गटाच्या माध्यमातून ‘ठाणे बंद’ची हाक देण्यात आली आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. राज्य सरकारनेही या महामोर्च्याला परवानगी दिली आहे, असं असताना ‘ठाणे बंद’ करण्याचा जो कुटील डाव त्यांनी केला आहे, हा ठाणेकरांचा अपमान आहे”, अशी संतप्त प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी दिली आहे. “तुम्ही सरकारमध्ये असताना बंद करता, याची तुम्हाला लाज वाटायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे”, असेही ते म्हणाले.
“ठाण्यात रात्रीपासून बसेस बंद करण्यात आल्या आहेत. रिक्षा बंद करण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आला आहे. लोकांना वेठीस धरण्यात येत आहे. आज अनेक नागरिकांना पायी प्रवास करावा लागतो आहे. अनेक ठिकाणी दुकानंदेखील बंद करण्यात आली आहेत. एकीकडे सरकार आमच्या मोर्च्याला परवानगी देतं आणि दुसरीकडे ठाण्यातील लोकं मोर्च्यात सहभागी होऊ नये म्हणून बसेस बंद करण्यात येतात, हा दुटप्पीपणा आहे. येत्या निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवेल”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.