परदेशी जातीच्या श्वानांना ज्याप्रमाणे मोठय़ा प्रमाणात मागणी असते. त्याचप्रमाणे देशी श्वानही आपल्या रुबाबी व्यक्तिमत्त्वाने श्वानप्रेमींमध्ये आपले स्थान कायम राखतात. हाऊंड या प्रकारात मोडणारे राजपलायम जातीचे भारतीय श्वान विशिष्ट गुणांमुळे श्वानप्रेमींमध्ये लोकप्रिय ठरत आहेत. दक्षिण भारतात तमिळनाडू येथे राजपलायम श्वानांचे मूळ सापडते. ब्रिटिश सरकार पश्चिम भारतात नायकर राजघराण्याशी लढत असताना ब्रिटिशांना या राजघराण्यात राजपलायम श्वान आढळले. त्या वेळी राजपलायम जातीच्या श्वानांचा उल्लेख केला गेला. सध्या सैन्यदलात ज्याप्रमाणे श्वानांचा उपयोग केला जातो, त्याचप्रमाणे पूर्वी नायकर राजांनी शत्रूशी सामना करण्यासाठी आपल्या सैन्यात राजपलायम जातीच्या श्वानांचा उपयोग केला. तीस ते पस्तीस इंच उंच, काटक शरीरयष्टी आणि शुभ्र पांढरा रंग ही या श्वानांची शारीरिक वैशिष्टय़े आहेत. या श्वानांचा शुभ्र पांढरा रंग कायम राहण्यासाठी वेगवेगळ्या रंगांची पिले जन्माला आली तर पूर्वी अशा श्वानांना मारले जायचे. त्यामुळे केवळ पांढऱ्या रंगातच हे श्वान पाहायला मिळतात. रुबाबी व्यक्तिमत्त्व, काटक शरीरयष्टी आणि प्रचंड आत्मविश्वास यामुळे शत्रूशी सामना करण्याचे प्रचंड सामथ्र्य या श्वानांमध्ये असते. पूर्वी शिकारीसाठी, भातशेतीचे जंगली प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी या श्वानांचा उपयोग केला जायचा. राजपलायम जातीचे चार श्वान एकत्र आले की ते वाघाशीही सामना करू शकतात, तितके सामथ्र्य त्यांच्यापाशी असते. तमिळनाडूमधील विरुधनगरी या गावात काही वर्षांपूर्वी राजपयालम जातीच्या श्वानांनी वाघाच्या हल्ल्यापासून एका व्यक्तीला वाचवले होते. मध्यंतरी काही काळ या श्वानांचे अस्तित्व कमी झाले होते. मात्र तमिळनाडू सरकारने ‘सेव्ह द राजपलायम’ या मोहिमेअंतर्गत राजपलायम श्वानांना पुन्हा एकदा ओळख निर्माण करून दिली. तमिळनाडू राज्यात मोठय़ा प्रमाणात स्थानिकांनी हे श्वान पाळायला सुरुवात केली. पॉलिगर या राजघराण्याच्या नावावरून या श्वानांना पॉलिगर हाऊंड असेही संबोधतात. राजपलायम जातीच्या श्वानांचे अस्तित्व टिकवण्यासाठी पशुधनविकास मंत्रालयात राजपलायम श्वानांसाठी वेगळा विभाग करण्यात आला. या श्वानांची वैशिष्टय़े आणि लोकप्रियता पाहता इतर राज्यांतही मोठय़ा प्रमाणात या श्वानांचे संवर्धन केले जाते. या श्वानांच्या खास वैशिष्टय़ांमुळे ब्रिटनमध्येही राजपलायम जातीचे संशोधन सुरू आहे.
शेतीचे रक्षण, शेतमालक निर्धास्त
मोठमोठय़ा शेतजमिनींचे रानडुक्कर, मोठे प्राणी यांच्यापासून रक्षण करण्यासाठी राजपलायम श्वान अतिशय तरबेज असतात. त्यामुळे शेतीचे रक्षण करण्यासाठी राजपलायम शेतात ठेवल्यास शेतमालक निर्धास्थ असतात. आदिवासी भागातही राजपलायम श्वान पूर्वीपासून जपलेले आहेत.
निडर स्वभाव
काटक शरीरयष्टी आणि आत्मविश्वास यामुळे परक्या माणसावर, शत्रूशी सामना करण्याचे प्रचंड सामथ्र्य या श्वानांमध्ये असते. आव्हाने स्वीकारण्याची यांची वृत्ती मालकाला निर्धास्त ठेवते. कुटुंबात सर्वासोबत हे श्वान राहत असले तरी कुठल्याही एका व्यक्तीचा ताबा या श्वानांवर असणे गरजेचे असते. तमिळनाडू राज्यात वातावरण दमट आहे. कोणत्याही वातावरणात तग धरून राहण्याची या श्वानांची क्षमता उल्लेखनीय आहे.
प्रसारासाठी राजपलायमचा पोस्टल स्टॅम्प
नामशेष होत चाललेली राजपलायम श्वानाची जात टिकून राहण्यासाठी, या श्वानजातीच्या प्रसारासाठी राजपलायम भारत सरकारतर्फे पोस्टल स्टॅम्प तयार करण्यात आला. पोस्टाच्या तिकिटावर राजपलायम श्वानाचे चित्र प्रसिद्ध करण्यात आले.