भाषाशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र व्युत्पत्ती, इतिहास संशोधन, वेद-पुराणांची चिकित्सा आदी बहुविध ज्ञानक्षेत्रांमध्ये लिलया विहार केलेल्या आणि आपल्या लेखणी व वाणीने महाराष्ट्रीय संस्कृतीचे सार मांडलेल्या राजारामशास्त्री भागवत यांच्या निवडक लेखनाचे सहा खंड तब्बल पस्तीस वर्षांनंतर नव्या आवृत्तीच्या स्वरूपात उपलब्ध झाले आहेत. दुर्गाबाई भागवत यांनी संपादित केलेला सहा खंडांतील ज्ञानठेवा पुन्हा एकदा अभ्यासक-संशोधकांसाठी खुला झाला आहे.
संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक असलेल्या राजारामशास्त्री भागवत यांनी मराठी भाषा, महाराष्ट्र, समाजसुधारणा, इतिहास, धर्मचिकित्सा आदी अनेक विषयांवर संशोधनपर विपुल लेखन केले. एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध हा त्यांच्या लेखनाचा काळ. केरळ कोकीळ, इंदुप्रकाश, नेटिव्ह ओपिनियन, विविधज्ञानविस्तार, ज्ञानप्रकाश आदी तात्कालीन महत्त्वाच्या नियतकालीकांतून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लिखाणाने त्या काळात महाराष्ट्रातील वैचारिक विश्वात घुसळण घडवून आणली होती. त्यांच्या निवडक लेखांचा संग्रह त्यांच्या नात असणाऱ्या विदुषी दुर्गाबाई भागवतांनी १९५० मध्ये काढला होता. पुढे १९७०च्या दशकात राजारामशास्त्रींच्या निवडक लेखनाच्या पुस्तकासाठी साहित्य अकादमीशी दुर्गाबाईंचा व्यवहारही झाला होता. पंरतु त्यावेळी पृष्ठसंख्येबाबत झालेल्या वादामुळे ते पुस्तक येऊ शकले नाही. त्यानंतर दुर्गाबाईंनी या लेखनात राजारामशास्त्रींच्या आणखी निवडक साहित्याची भर घालून वरदा प्रकाशनातर्फे त्याचे सहा खंड १९७९ मध्ये प्रकाशित केले. पंरतु, मागील काही वर्षे हे खंड बाजारात उपलब्ध नव्हते. महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले हे साहित्य पुन्हा नव्या आवृत्तीत उपलब्ध झाले आहे.
या सहा खंडांमध्ये राजारामशास्त्रींनी १८८७ मध्ये ‘विविधज्ञानविस्तार’मधून लिहिलेल्या ‘मऱ्हाटय़ासंबंधीने चार उद्गार’ ही इतिहासविषयक लेखमाला, ‘ब्राह्मण आणि ब्राह्मणी धर्म’ हे पुस्तक, तसेच वैष्णवमत, शककाल, प्रार्थना समाज, मोल्सवर्थच्या शब्दकोशावरील टीका, संस्कृत- मराठी भाषा, महाराष्ट्र आदी अनेक विषयांवरील लेखन समाविष्ट करण्यात आले आहे. याशिवाय शिवाजी महाराज व संत एकनाथ यांच्या मराठीतील पहिल्या आधुनिक चरित्रांचाही यात समावेश आहे. तसेच या सर्व खंडांना दुर्गाबाईंनी लिहिलेल्या विवेचक प्रस्तावनाही यात वाचायला मिळतात. पस्तीस वर्षांनंतर या खंडांची दुसरी आवृत्ती आल्याने या वैचारिक साहित्याचे दालन पुन्हा किलकिले झाले आहे.
राजारामशास्त्रींनी केलेले वैचारिक लेखन हा महाराष्ट्राचा साहित्यिक ठेवा आहे.सहा-सात वर्षे हे खंड विक्रीसाठी उपलब्ध नव्हते. त्यामुळे वाचकांची मागणी होती. आजही हे लेखन वाचकांना वाचावेसे वाटते, हेच यातून कळते.
– गौरव गौर, वरदा प्रकाशन, पुणे.