मुंबई : अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आणि कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्णोई याच्याशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी गेल्या महिन्यात अटक करण्यात आलेल्या राजस्थानस्थित युट्यूबरला अतिरिक्त महानगरदंडाधिकाऱ्यांनी सोमवारी जामीन मंजूर केला. बनवारीलाल गुज्जर याच्यावर गुन्हेगारी धमकी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर गुज्जर याने जामिनासाठी अर्ज केला होता. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. आर. पाटील यांनी सोमवारी गुज्जर याच्या अर्जावर निर्णय देताना त्याला जामीन मंजूर केला.

हेही वाचा >>> जुहू, डी एन नगरमधील इमारत उंचीवरील बंदी उठणार? रखडलेल्या ४०० हून अधिक इमारतींचा दिलासा

पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, गुज्जर याने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर चित्रफित प्रसिद्ध केली होती. त्यात, त्याने सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याचवेळी, त्याचे लॉरेन्स बिश्णोई, गोल्ड ब्रार आणि इतर गुंडांशी असलेल्या संबंधांबाबतही सांगितले होते. गुज्जर याने केवळ त्याच्या ऑनलाइन वाहिनीची प्रेक्षकसंख्या वाढवण्यासाठी ही चित्रफित तयार केल्याचेही पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवालात (एफआयआर) म्हटले आहे. दुसरीकडे, आपल्याला कोणत्याही ठोस पुराव्यांअभावी या प्रकरणी गोवण्यात आल्याचा दावा गुज्जर याने जामिनाची मागणी करताना केला होता. आपण मनोरंजन आणि प्रसिद्धीसाठी चित्रफिती तयार करतो व त्या युट्यूबवरून प्रसिद्ध करतो. सलमान खान याच्याशी संबंधित चित्रफितीत नेमके काय म्हटले आहे याचा तपशील एफआयआरमध्ये आहे. परंतु, त्यात आपण सलमान खान याला जीवे मारण्याबाबत काहीच म्हटलेले नाही. त्यामुळे, आपल्यावर ज्या कलमांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत ते विचारात घेता आपल्याविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असा दावाही गुज्जर याने जामीन अर्जात केला होता.